मुक्तपीठ टीम
भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. सामान्य माणसाला अभिमान वाटावा असाच त्यांचा जीवनप्रवास असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अभिनंदनाचा हा प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, द्रौपदी मुर्मू हे एक जिद्दी आणि समर्पित व्यक्तिमत्वाचे नाव आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतिपदी त्यांची नियुक्ती ही सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. ओडीसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील बैदापोसी या छोट्याशा गावात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. भुवनेश्वर येथे रमादेवी महाविद्यालयातून १९७९ मध्ये त्या कला शाखेतून पदवीधर झाल्या. ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यातही त्यांनी सेवा केली. पुढे त्या शिक्षक झाल्या. त्या १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या.
द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. २००७ मध्ये ओडिशा विधानसभेतर्फे सर्वोत्तम आमदारांना दिल्या जाणाऱ्या नीलकंठ पुरस्काराने गौरवण्यात आले. २० वर्षाच्या दांडग्या अनुभवासह त्यांनी आदिवासींच्या सक्षमीकरणसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ६४ वर्षांच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित, आदिवासी,लहान मुले यांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटांनाही त्यांनी धीराने तोंड दिले. त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.
२०१५ मध्ये झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. विनम्रता, वाणीत गोडवा आणि सर्वांना सन्मान देण्याच्या वृत्तीमुळे त्या नेहमीच पालकाच्या भूमिकेत असतात. २०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होणे हे भारतीय लोकशाहीचे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे, त्यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतिपदी झालेली निवड ही शेतकरी सुपुत्राचा सन्मान आहे. ते राजस्थानच्या झुंझुनूच्या किथाना गावचे आहेत. या गावाशी आजही त्यांचे नाते घट्ट आहे.
फार्महाऊसमध्ये जगदीप धनखड यांनी त्यांच्या गावातील महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्र उघडले, मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरु केले, संगणक अभ्यासक्रमही सुरु केलेत. इंग्रजीत बोलणारे धनखड हे गावातील पहिले व्यक्ती होते. त्यांची इच्छा आहे की गावातील प्रत्येक मुलगा उत्तम इंग्रजी बोलला पाहिजे. याच विचारातून त्यांनी काही वर्षांपूर्वी स्पोकन इंग्लिशचे वर्ग आणि संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. एक वाचनालयही बांधले, जिथे सर्व प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे. गेल्या १५ वर्षात २५०० हून अधिक महिलांना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनही दिली जाते. तर प्रशिक्षणादरम्यान महिलांना कापड आणि धाग्याचा कोणताही खर्च उचलावा लागत नाही.
जगदीप धनखड यांचा देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. त्यानंतर चितौडगड येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी राजस्थानच्या प्रतिष्ठित महाराज कॉलेज, जयपूरमधून पदवी पूर्ण केली आणि भौतिकशास्त्रात बीएसई पदवी मिळवली. त्यानंतर १९७८ मध्ये जयपूर विद्यापीठात एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर सुरुवातील राजस्थान उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. १९८८ पर्यंत ते देशातील नामवंत वकिलांपैकी एक बनले. त्यांची राजकीय कारकीर्द सुमारे ३० वर्षांची आहे. १९८९ मध्ये ते सक्रिय राजकारणात आले आणि त्याच वर्षी झुंझुनू येथून निवडणूक जिंकून ९व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. १९९३ ते १९९८ या काळात अजमेर जिल्ह्यातील किसनगंज विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व केले. २०१९ मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या विधीज्ञाची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
या अभिनंदन प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य कपिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.