मुक्तपीठ टीम
मुंबई ते मांडवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा इतर पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता १ नोव्हेंबर २०२२ म्हणजेच आजपासून वॉटर टॅक्सी मुंबई ते मांडवा दरम्यान सुरू होणार आहे. मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होईल. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे.
सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती.
वॉटर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम सुविधांचे आयोजन!
- वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता.
- सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटा येथे ही वॉटर टॅक्सी सुरू आहे.
- मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
वॉटर टॅक्सी तिकीट बुकिंगविषयी सविस्तर माहिती…
- वॉटर टॅक्सी तिकीट बुकिंग सेवा २९ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
- सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवासी २९ ऑक्टोबरपासून ऑनलाइन तिकीट काढू शकतात.
- सुरुवातीच्या दिवसांत मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सकाळी १०.३० वाजल्यापासून टॅक्सी सेवा उपलब्ध असेल.
- प्रवाशांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहेत. . त्याच वेळी, गेटवे ऑफ इंडियावरून सेवा सुरू झाल्यावर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० या वेळेत टॅक्सी उपलब्ध असेल.
- मुंबई ते मांडवा दरम्यान जलमार्गाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४०० रुपये मोजावे लागणार आहेत.
लवकरच गेटवे ऑफ इंडियावरूनही वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. सध्या मांडवा दरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटा दरम्यान गेटवे ऑफ इंडिया येथून सेवा उपलब्ध होईल.