मुक्तपीठ टीम
“दिदीचा आवाज हा स्वर्गियच होता. तिच्यासारखा आवाज अजून पुढची दोन शतके तरी होणे शक्य नाही. ती आमचे दैवत आहे. आपल्या सर्वांसाठी दीदी आकाशापेक्षाही मोठी आहे,” अशा शब्दात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होते, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’त रंगलेल्या ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’च्या उत्तरार्धाचे! महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे उद्घाटन शिवरायांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून करण्यात आले.
यावेळी पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश कर्पे, सहकार निबंधक मुळशीचे शिवाजीराव घुले, ज्येष्ठ पत्रकार आनंद अग्रवाल, शैलेश काळे, मुरलीधर मोहोळ, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. त्यापैकी कसबा गणपती मंडळांचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये, तांबडी जगेश्वरी गणपती मंडळांचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम गणपती मंडळांचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळांचे अध्यक्ष संजीव जावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांचे महेश सूर्यवंशी, तुळशीबाग गणपती मंडळांचे विकास पवार, बढेकर ग्रुपचे अण्णा बढेकर, रांजेकर ग्रुपचे रवींद्र रांजेकर आदी मंचावर उपस्थित होते.
उषा मंगेशकर म्हणाल्या, “आम्ही अनेक दिग्गजांना लहानपणापासून ऐकत आलो आहोत. दिदीचे युग सुरू झाले आणि गाण्याची सर्व पद्धतच बदलली. पण ती फारच सहज गात असे. तिचे गाणे जेवढे उंच होते, त्यापेक्षा ती व्यक्ती म्हणून कितीतरी चांगली होती. आम्हाला माहितही नसे पण ती सतत अनेकांना मदत करत असे, हे आम्हाला काही वर्षांनी कळायचे. तिच्या अनेक गाण्यांच्या सीडीच्या कव्हरचे मला पेंटिंग करता आले आणि तिला त्याचे फार कौतुक होते. या पेंटिंग्जचे पुस्तक येत्या ३ मे रोजी प्रकाशित होत आहे.”
“दिदीला मराठी, महाराष्ट्र आणि देशाचा प्रचंड अभिमान होता. ती एकदम मोठी देशभक्त होती. तिला देशासाठी जेजे काही करता आले ते सारे तिने केले. छत्रपती शिवाजी महाराज तिचे दैवत होते,” असेही त्यांनी सांगितले.
लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’ या कार्यक्रमाद्वारे सुरांजलीचा उत्तरार्ध अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांनी लता मंगेशकर यांचा सुरेल प्रवास उलगडला. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे, सावनी रवींद्र, गायक अनिरुध्द जोशी, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या सुरांनी हा सुवर्णकाळ उजळला.
‘भेटी लगी जिवा’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘खेळ मांडियेला’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंगांनी वातावरणात पावित्र्य भरत आल्हाददायकता रसिकांनी अनुभवली. त्यानंतर ‘जाहल्या तिन्ही सांजा’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ या गीतांबरोबरच ‘जय जय शिवराया’ ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिली आरती सादर करण्यात आली.
यावेळी दर्शना जोग, सत्यजित प्रभू (की-बोर्ड), अमोघ दांडेकर (गिटार), आदित्य आठल्ये (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (ढोलकी, पखवाज), अभिजित भदे (वेस्टर्न रिदम) यांनी साथसंगत केली. निलेश यादव यांनी ध्वनी संयोजन केले.
या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुप, बढेकर ग्रुप, गोखले कंस्ट्रक्शन्स, रावेतकर बिल्डर्स, रांजेकर बिल्डर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., बुलढाणा अर्बन बँक लि., सुहाना मसाले, पी.एन.जी. ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
वृध्द कलाकारांसाठी उभारणार ‘स्वरमाऊली’ वृद्धाश्रम
संगीतातील अनेक कलाकार वृध्द झाल्यावर गरिबीने बऱ्याचदा त्यांचे फार हाल होतात. अशा कलाकारांसाठी लता मंगेशकर यांना वृद्धाश्रम काढण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्या हयातीत हे मूर्त रूपात आले नसले तरी आता लवकरच ते उभारणार असल्याची घोषणा ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी यावेळी केली.
संस्कृती कलागौरव पुरस्कार यापुढे ‘स्वरलता संस्कृती कलागौरव पुरस्कार’
संस्कृती कलागौरव पुरस्कार भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित करत संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढील वर्षापासून हा पुरस्कार ‘स्वरलता संस्कृती कलागौरव पुरस्कार’ नावाने दिला जाईल, असे उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत घोषित केले.