मुक्तपीठ टीम
लता मंगेशकर यांचं संगीतावर जसं प्रेम होतं तसंच क्रिकेट आणि क्रिकेटर्सवरही. सचिनला त्या मुलगा मानत आणि सचिनही त्यांना आई म्हणत आई सरस्वतीसारखा सन्मान देत असे, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्यांचे आणखीही काही किस्से आहेत. त्यांच्या एका ट्वीटमुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या एम एस धोणीने निवृत्तीचा विचार बदलला आणि तो पुढील एक वर्ष आणखी खेळला. तसंच त्यांच्या मदतीमुळे भारतीय संघाला १९८३च्या विश्वचषक स्पर्धेच्या विजयाबद्दल पुरस्कार देणं शक्य झालं.
योगायोग असा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी असे अनेक क्रिकेटपटू घडवणाऱ्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातच लता दीदींना अखेरचा निरोप देण्यात आला. लता मंगेशकर या क्रिकेटच्या मोठ्या चाहत्या होत्या. त्या अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून क्रिकेटबद्दल, सामन्याबद्दल किंवा त्या संबंधित बातम्या पोस्ट करत असत. लतादीदींना संगीतानंतर जर कसलं आकर्षण होतं, तर ते क्रिकेट खेळाचं होतं.
लतादीदींच्या ट्वीटमुळे लांबली धोनीची निवृत्ती!
- लता मंगेशकर या माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या मोठ्या चाहत्या होत्या.
- २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा पराभव झाला तेव्हा धोनी लवकरच क्रिकेटला अलविदा म्हणेल अशा बातम्या येत होत्या.
- त्या बातम्या ऐकून लतादीदी अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी धोनीसाठी एक ट्वीट केले.
यामध्ये लतादीदी यांनी लिहिले की, “प्रिय धोनी जी, आजकाल मी ऐकत आहे की तुम्हाला खेळातून निवृत्ती घ्यायची आहे. कृपया असा विचार करू नका. देशाला तुमची आणि तुमच्या योगदानाची गरज आहे. कृपया खेळातून निवृत्ती घेण्याचा विचारही करू नका.”
धोनीनेही लता दीदींच्या ट्वीट हाकेला साद दिली. त्याने तात्काळ तेव्हा निवृत्ती घेतली नाही तो निर्णय त्याने एक वर्ष लांबवला. वर्षभरानंतरच त्याने निवृत्ती जाहीर केली.
क्रिकेट संघाच्या पुरस्कारांसाठी पैसा उभा केला
- आज बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, पण 1983 मध्ये स्थिती अशी नव्हती.
- तेव्हा 1983 च्या विजेत्या संघाला बक्षीस देण्यासाठी बीसीसीआयकडे पैसे नव्हते.
- बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे लता मंगेशकर यांच्याकडे आले.
- त्यांनी त्यांना इंदिरा गांधी स्टेडियममध्ये कॉन्सर्ट करण्याची विनंती केली.
- लतादीदींनी आनंदाने त्यांनी होकार दिला होता.
- हा कार्यक्रम खूप आवडीचा ठरला आणि त्यातून जे काही पैसे आले ते बक्षीस म्हणून क्रिकेटपटूंमध्ये वाटले गेले. त्या मैफलीत क्रिकेटपटूंनी गाणीही गायली. ते दृश्य अप्रतिम होते.
लता मंगेशकरांसाठी दोन तिकिटे कायम आरक्षित!
- बीसीसीआयही त्यांचे योगदान विसरली नाही.
- त्यांच्याविषयीचा कृतज्ञतापूर्वक आदर म्हणून भारतातील प्रत्येक स्टेडियममध्ये त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दोन व्हीआयपी पास ठेवण्यात आले.
- बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्याकडे प्रत्येक सामन्यासाठी प्रायोजकांचा कोटा, राज्य संघटना, त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यात लताजींसाठी दोन तिकिटे ठेवण्यात आली होती.”