रॉबिन डेव्हिडसन / सांगली
सांगली जिल्ह्यातील शिगाव येथील शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोमित यांचे वडील तानाजी चव्हाण यांनी रोमित यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. तत्पूर्वी लष्कर आणि पोलिसांच्या वतीने सलामी देण्यात आली. बंदुकीच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या. शहीद चव्हाण यांना, हजारो पुरुष, महिला आणि तरुणानी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. शिगाव येथे वारणा नदी काठावर शहीद रोमित चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज शहीद रोमित चव्हाण यांच पार्थिव शिगाव येथे आणण्यात आला. चव्हाण यांच्या घराजवळ त्यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर शिगाव येथे संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शहिद रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण शहीद झाले होते.