मुक्तपीठ टीम
मुसळधार पावसामुळे कोकणातील अनेक भागात पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. यात ३५ घरे मातीखाली गेल्यामुळे यामध्ये एकूण ८० ते ८५ गावकरी बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांचा सपंर्क तुटला आहे. या ठिकाणी एनडीआरएफची मदत पाठवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेले तळीये गावात संध्याकाळी ५ ते ६ च्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. बेपत्ता असलेल्यांचा आकडा ८० ते ८५ वर असल्याचं कळतंय. पोलीस, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
- गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. इथल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड शहरात अजून पाणी भरलेले आहे.
- महाडमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.
- भोर-महाड मार्गावर दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला आहे.
- महाडमध्ये पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
- त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी अडकले असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.