मुक्तपीठ टीम
”मी स्वतः कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे गेले आहे. १९८०च्या महिला चळवळीने परिवर्तन घडवून आणत मला बळ दिले. मी एक वकील बनून महिलांच्या हक्कांसाठी कायदेशीर मार्गाने लढण्यासाठी संस्था स्थापन केली. त्यामुळे हा पुरस्कार केवळ माझा नसून महिलांसाठी लढणाऱ्या सर्वांचा आहे.” अशा भावना अॅड. फ्लॅव्हिया अॅग्नेस यांनी व्यक्त केल्या. त्यांना यंदाचा ‘लाडली जेंडर चॅम्पियन’ पुरस्कार प्राप्त झाला. रविवार ५ डिसेंबरला सायंकाळी ‘पॉप्युलेशन फर्स्ट’च्या युट्युब पेजवर ‘राष्ट्रीय लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’च्या ११व्या सोहळ्याचे प्रक्षेपण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. चित्रपट, जाहिरात, मीडिया, पुस्तके, रंगभूमी आदी क्षेत्रात एकूण ३९ विजेत्यांना पुरस्कार मिळाले.
”लाडलीने या पुरस्काराच्या माध्यमातून एक असे व्यासपीठ तयार केले आहे जिथे महिलांना मुक्तपणाने व्यक्त होता येते. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रसारमाध्यमांचा विस्तार होत आहे. अशावेळी माध्यमांना सर्वसमावेशक बनवण्याचे ध्येय लाडलीने बाळगले आहे, ती काळाची गरज आहे.” असे सोहळ्याच्या मुख्य अतिथी, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त मृणाल पांडे म्हणाल्या. ”वास्तविक जीवनात स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य करणाऱ्या नवीन पिढीकडे आम्ही आशेने पाहत आहोत. एक सशक्त समाज उभा करण्यासाठी त्यांचा आवाज ऐकलं जाणं आवश्यक आहे. पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी लेखन, नाटक, पुस्तके, चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे लिंगभेदाबाबत विश्लेषण केले आहे. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. या सर्वांचा आम्ही पुरस्कार देत सन्मान करत आहोत.” असे ‘पॉप्युलेशन फर्स्ट’च्या संचालिका डॉ.ए.एल.शारदा म्हणाल्या. यावेळी ‘पॉप्युलेशन फर्स्ट’चे संस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त बॉबी सिस्ता उपस्थित होते.
ज्येष्ठ पटकथा लेखिका, वेशभूषाकार, कला दिग्दर्शिका शमा जैदी यांना ‘लाडली ऑफ सेंच्युरी’ पुरस्कार देण्यात आला. ”पूर्वी क्वचित महिला कला दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत होत्या. पण मी माझ्या कामाने या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे मला प्राप्त झालेला हा पुरस्कार मोलाचा आहे. प्रत्येकाची मुलगी ही लाडली असते.” अशा भावना शमा जैदी यांनी व्यक्त केल्या. त्यांनी सत्यजित रे, श्याम बेनेगल आणि एम.एस.साथ्यु यांसारख्या दिग्गज निर्मात्यांसह काम केले आहे. उमराओ जान, गरम हवा, झुबेदा अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.
लिंग भेद, सामाजिक मर्यादा यांना आव्हान देत एक प्रेरणा स्त्रोत बनून केलेल्या कार्यासाठी पद्मश्री डॉ. नीलम मानसिंग चौधरी यांना ‘लाडली जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला. मूळच्या चंदीगढच्या असून त्यांचे रंगभूमीतील कार्य नावाजले जाते. “रंगभूमी ही अशी एक जागा आहे जी प्रत्येकाच्या समूहाने बनते. माझ्या प्रवासात हा समूह कायम सोबत होता. ते कदाचित पडद्यासमोर दिसत नसले तरी नेहमी सोबत होते. त्यामुळे या प्रसंगी मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.” असे डॉ. नीलम चौधरी म्हणाल्या. चित्रपट दिग्दर्शिका आणि लेखिका तनुजा चंद्रा यांना ‘लाडली वुमन बिहाईंड द स्क्रीन’ पुरस्कार देण्यात आला. तनुजा त्यांच्या महिला प्रधान चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. त्यांचे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ चित्रपट गाजले आहेत. ”दोन दशकांहून अधिक काळ माझा प्रयत्न पडद्यावर स्त्री प्रतिनिधित्वासाठी राहिला आहे. येत्या काही वर्षांत महिला केंद्रित कथा मांडण्याची माझी संकल्पना आहे.” असे तनुजा म्हणाल्या.
या प्रसंगी, ‘एकजूट थिएटर ग्रुप’ आणि ‘आरभी- द सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’द्वारे तरुण व्हायोलिन वादकांच्या समवेत सादरीकरण करण्यात आले. यावेळी नॉर्वेजियन राजदूत हॅन्स जेकब फ्रायदेनलुंड आणि यूएनएफपीए इंडियाचे देश प्रतिनिधी श्रीराम हरिदास अतिथी म्हणून उपस्थित होते.
इतर पुरस्कार विजेते
- दिग्दर्शक अनुभव सिन्हा – थप्पड – थिएट्रिकल रिलीज
- ‘द ग्रेट इंडियन किचन -ओटीटी विभाग
- द वुमन ऑफ माय मिलियन – डॉक्युमेंट्री
- ‘काटेलाल अँड सन्स’ मालिकेतील गरिमा आणि सुशीला – लाडली द मोस्ट इन्स्पायरिंग वुमन प्रोटॅगोनिस्ट इन टीव्ही सीरिअल
- ‘भीमा ज्वेलरी’च्या ‘प्युअर अॅज लव्ह’ – ग्रँड प्रिक्स विभाग
- #Nohandunwashed – Savlon – ओगिल्व्ही इंडिया
- #StopTheBeautyTest – Dove – ओगिल्व्ही इंडिया
- परमेश शहानी यांचे आत्मचरित्र ‘क्वेरिस्तान’, रितुपर्णा चॅटर्जी यांचे ‘द वॉटर फिनिक्स’, कविता कृष्णन यांचे नॉन-फिक्शन ‘फियरलेस फ्रीडम’, वंदना राग यांचे फिक्शन ‘बिसात पर जुगनू’ या पुस्तकांना पुस्तक श्रणीत पुरस्कार
- प्रादेशिक विजेत्यांपैकी पंधरा पत्रकारांना त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त