सायली नातू
सायली नातू ह्या केवळ गृहिणीच नाही तर अंधेरी येथील भवन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर देखील आहेत, त्यांनी बीएमएममधून ग्रॅज्युएशन केले आहे आणि एमजेएमसीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, त्या राज्य पात्रता परीक्षेत सुद्धा उत्तीर्ण आहेत. आता त्यांनी कंपॅरिटिव्ह मायथॉलॉजिमध्ये पदव्युत्तर पदविकासाठी परीक्षा दिली आहे. एवढ्या व्यस्त असुन सुद्धा त्यांना कविता लिहायला आवडतात. खालील लिहीलेल्या कविता ह्या त्यांनी रचलेल्या आहेत.
‘क्षण’
कधी ते आठवतात, कधी तेच आठवणी बनतात,
भावनांच्या फुटक्या बंधाऱ्याला तेच एकत्र घेऊन येतात.
क्षणात आपण हसतो, क्षणात आपण रडतो
कित्येकदा क्षणांमध्ये अनेक क्षण वेचत राहतो
काही क्षण निर्धाराचे, काही कर्तृत्व गाजवल्याचे
काही मात्र पराभवाचे, कडू औषध चाखल्याचे
काही क्षण आनंदाचे, मनात पल्लवी फुलल्याचे
काही मात्र शोकाचे, क्षणात फुल खुडल्याचे
काही क्षण उन्हातले, काही चिम्ब भिजणारे
कधी पावसात कधी मायेत ओले चिंब न्हाणारे
काही क्षण भुकेले, पोटात कण नसणारे
काही मात्र जेवणानंतर तृप्त ढेकर देणारे
काही क्षण जन्माची सुखद नांदी आणणारे
काही मात्र दुःखाची दाट सावली पसरविणारे
काही क्षण प्रत्येक क्षणी हवेहवेसे वाटणारे
काही मात्र क्षणोक्षणी फक्त त्रास देणारे
काही क्षण कापसासारखे, हळुवार स्पर्श करणारे
काही मात्र काट्यासारखे खोल मनात रूतणारे
काही क्षण एकत्रातले, खूप मजेत घालवलेले
काही मात्र एकटेपणात, विरहात विरलेले
काही क्षण भूतकाळातले recap मध्ये जगणारे
काही मात्र भविष्याच्या जिज्ञासेने भिजलेले
काही क्षण आठवणी झाल्याचे आपल्याला पटविणारे
काही क्षण आतुर मात्र, आठवण होऊ पाहणारे!