मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा २२ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भाजपा प्रवेश निश्चित झाला आहे. आज अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर अधिकृतरीत्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र आणि नाशिकमधील निफाड येथील युवा नेते यतीन कदम यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. कृपाशंकरांचा पक्ष प्रवेश भाजपाच्या मिशन मुंबई मनपासाठी महत्वाचा आहे.
भाजपाचा मुंबईत राजकीय फायदा कोणता?
- मुंबईत उत्तर भारतीय मतदार हा राजकीय समीकरणांमधील महत्वाचा घटक आहे.
- भाजपाकडे असलेल्या उत्तर भारतीय नेत्यांमध्ये अमरजीत मिश्रा वगळता सर्वसामान्य उत्तर भारतीयांशी थेट संपर्क असलेला नेता नाही.
- मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांच्या रूपाने उत्तर भारतीयांचा मुंबईतील एक प्रमुख नेता भाजपामध्ये प्रवेश करत आहे.
- कोरोनाच्या काळात काही महिन्यांपासून त्यांनी खास अभियान राबवून मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पालघर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क साधला आहे.
- कृपाशंकर सिंह यांच्या भाजपा प्रवेशामुळे त्यांना मानणारा मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील उत्तर भारतीय मतदारांचा उरला सुरला वर्गही हात सोडून कमळ हाती घेण्याची अपेक्षा आहे.
- दुसरीकडे काँग्रेसकडे माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान, माजी खासदार संजय निरुपम यांच्याशिवाय मोठा उत्तर भारतीय नेता नाही.
काँग्रेसवर का नाराज झाले कृपाशंकर सिंह?
- कृपाशंकर सिंह हे कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये मोजले जात होते.
- गांधी घराण्याशी (सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी) त्यांचे खूप जवळचे नाते होते.
- कृपाशंकर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी स्वत: मुंबई कॉंग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या.
- राहुल गांधींनी कॉंग्रेसची सूत्रे स्वीकारताच मुंबईतील राजकीय समीकरणे बदलू लागली.
- कृपाशंकर सिंग यांच्याऐवजी राहुल यांनी मूळचे बिहारमधील हिंदी भाषिक नेते संजय निरुपम यांना संघटनेत महत्व दिले, तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट झाली.
- त्याचवेळी बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांमध्ये कृपाशंकर आणि त्यांचे कुटुंब अडकले.
- त्यांच्याविरोधात खूपच गदारोळ झाला. पण काँग्रेसकडून काहीच मदत झाली नाही.
- प्रकरणात त्यांची फसवणुक करण्यास सुरवात केली आणि गांधी परिवार सर्व काही जाणूनच गप्प राहिले.
- पुढे राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने त्यांच्याविरोधातील गुन्ह्यांना पुढे नेले नाही. तेव्हापासून त्यांची भाजपाशी जवळीक वाढू लागली.
- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृपाशंकर यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेल्यानं चर्चा झाली होती.
लोकसभेच्या उमेदवारीतही डावलले गेले
- कृपाशंकर सिंह यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
- राहुल गांधींनी कृपाशंकर सिंगऐवजी संजय निरुपम यांना या जागेवर उमेदवार केले.
- खरंतर निरुपम उत्तर मुंबईचे खासदार होते, त्यामुळे कृपाशंकर यांच्या ते अधिकच जिव्हारी लागलं.
- खरंतर मुंबई कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचा कृपाशंकर यांच्या उमेदवारीसाठी कौल होता.
- पुढे कृपाशंकर सिंग यांनी कॉंग्रेसच्या स्क्रिनिंग समितीच्या बैठकीत कलम ३७०चा मुद्दा उपस्थित केला आणि पक्षाने यावर कोणतेही स्पष्ट मत न दिल्याने राजीनामा दिला.