उदयराज वडामकर / कोल्हापूर
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या कोल्हापूरमधील लढाईचं भविष्य मंगळवारी मतदानयंत्रांमध्ये बंद होणार आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधील पोटनिवडणुकीसाठी ३५८ केंद्रावर उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
कोल्हापूर उत्तर मधील पोटनिवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची पुढची तयारी सुरू झाली. उद्या मंगळवारी 358 केंद्रावर होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
लढत कुणामध्ये?
- काँग्रेस – दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार.
- भाजपा – सत्यजित कदम हे लढतीत उतरले आहेत.
मतदान केंद्र निहाय कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप केले गेले. त्यानंतर केएमटीच्या बसमधून कर्मचाऱ्यांना साहित्यासह त्या-त्या केंद्रावर पोहोचवले गेले. 358 मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1250 इतकी मतदार संख्या आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षातील उमेदवारीची चुरस सभेमध्ये झालेले आरोप-प्रत्यारोप पाहता या कालावधीत अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस दलाने खबरदारी घेऊन तगडा बंदोबस्त केला आहे. सात संवेदनशील ठिकाणावर पोलिसांची करडी नजर ठेवली आहे.
कडक पोलीस बंदोबस्त!
मतदानादिवशी आवश्यकतेनुसार पोलीस फौजफाटा करण्यात येणार आहे:
अप्पर पोलीस अधीक्षक -1
पोलीस उपाध्यक्ष -2
पोलिस निरीक्षक -7
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक -28
पोलीस -550
होमगार्ड -450
राज्य राखीव दल -2
केंद्रीय सुरक्षा दल -1.
गुडांच्या मुसक्या आवळल्या
मतदान शांततेने व सुरळीत पार पडावे यासाठी सुमारे 67 समाजकंटकांना हद्दपार केले तर पोलिसांच्या रेकॉर्डवरील 427 गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे
दिव्यांग , वृद्धांना मोफत वाहनाची सोय मतदान केंद्राच्या ठिकाणी केली आहे.
शनिवारी निकाल!
मतदान मंगळवारी झाल्यानंतर मतमोजणी शनिवारी दिनांक १६ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदाम येथे होणार आहे.