मुक्तपीठ टीम
कोल्हापुरातील सावली फाऊंडेशनने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाच शाळांच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. देखभाल म्हणजे केवळ संस्थेच्या नावाच्या फलक लावण्याची औपचारिकता पार पाडलेली नाही, तर त्यांनी खरोखरच शाळांना आपलं मानून त्यांचं रुपच बदलून टाकलं आहे.
सावलीचे अध्यक्ष प्रथमेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या ७२ शाळा आहेत. महानगरपालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत. त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे तिथं शिकण्यासाठी येणाऱ्या मुलांना त्या आपल्या वाटाव्या अशा सुविधायुक्त प्रसन्न वाटल्या पाहिजेत, या भूमिकेतून ज्ञान सावली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सावलीचे सचिव निखिल पोतदार यांनी सांगितले की, या उप्रकमाची सूरुवात फुलेवाडी रिंगरोडवरील रावबहादूर विचारे विद्यामंदिर येथील शाळेतून केली गेली. या शाळेतील पाण्याची टाकी, फॅन, लाईट, बाथरूमची डागडुजी करून वापरायोग्य करण्यात आली. शाळेची स्वच्छता करून तेथील वातावरण प्रसन्न करण्यासाठी आकर्षक कलात्मक चित्रांसह रंगरंगोटी करून त्याला वेगळे रूप आणले आहे.
याकामी वेद वायचळ, आदित्य दळवी यांचे मोलाचे सहकार्य आणि मदत मिळाली आहे, तसेच पंकज पेंट्स, व्हीनस कॉर्नर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
आता दुसऱ्या लाटेनंतर शाळेचे प्रवेश सुरू होणार आहेत, तर सावलीचे कार्यकर्ते शाळेत प्रवेश घेण्यासाठी परिसरात प्रबोधन करणार आहेत. या सर्व उपक्रमास शाळेतील मुख्याध्यापक विनोदकुमार भोंग, शिक्षक यांचे सहकार्य मिळत असून हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सावलीची पूर्ण टीम प्रयत्नशील आहे.
पाहा व्हिडीओ: