रोहिणी ठोंबरे / मुक्तपीठ टीम
आजचा दिवस म्हणजे ५ जून हा १९७४ पासून जगभरात पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने स्टॉकहोम परिषदेदरम्यान हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. पर्यावरण रक्षणावरील ती पहिली परिषद होती. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे, लोकांना पर्यावरणाबाबत जागरुकता मिळावी आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी. आपल्या देशात पर्यावरण जागरुकता खरं तर आपल्या संस्कृती आणि परंपरेतूनही आपल्या मनात रुजवली जाते. पण विकासाच्या नावाखाली काहीजण पर्यावरण विनाश अपरिहार्य मानतात आणि त्यातून मग पर्यावरणाला दुय्यम ठरवलं जातं. त्याचवेळी या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभं ठाकत पर्यावरण रक्षणासाठी लढा देणारे आपल्याकडेही कमी नाहीत. अशा लढवय्यांची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न…
सुंदरलाल बहुगुणा
- गेल्या शतकात ऐंशीच्या दशकात जेव्हा पर्यावरण हा विषय कोणाच्या खास अजेंड्यावर नव्हता तेव्हा सुंदरलाल बहुगुणांमुळे पर्यावरण रक्षणाची देशात चर्चा सुरु झाली. सुंदरलाल बहुगुणा हे सध्याच्या उत्तराखंडमधील एक समर्पित पर्यावरणवादी. चिपको आंदोलनाचे नेते.
- सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म १९२७ टिहरी गढवाल येथे झाला. १९८० दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी संपूर्ण गढवाल प्रदेशाचा दौरा केला आणि लोकांना झाडे आणि पर्यावरणाविषयी जागरूक करण्याचे काम केले.
- सुंदरलाल बहुगुणा यांनीही प्रसिद्ध टिहरी धरणाला विरोध केला होता.
- भूकंपग्रस्त भागात उत्तराखंड येतो आणि या धरणाचे बांधकाम जीवघेणे ठरू शकते, असे त्यांचे मत होते.
- विकासाच्या नावाखाली सुरु असलेली वृक्ष कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी चिपको आंदोलन सुरु केले.
- चिपको आंदोलन म्हणजे वृक्षावर पडणारे घाव वाचवण्यासाठी त्यांच्या बुंध्यांना मिठी मारून चिकटणे.
- हजारो लोकांनी सुंदरलाल बहुगुणांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात भाग घेतला.
- ते चिपको चळवळीचे नेते आणि देशातील सर्वात महत्वाचे पर्यावरणवादी म्हणून ओळखले जातात.
- पर्यावरण आणि झाडांच्या रक्षणासाठी त्यांना जगभर ख्याती मिळाली.
- पर्यावरण रक्षणाच्या या मोठ्या कार्यामुळे लोकांनी त्यांना वृक्षमित्र असे नावही दिले.
- भारत सरकारने सुंदरलाल बहुगुणा यांना १९८१ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.
- २०२१ मध्ये त्याचे निधन झाले.
सालुमरदा थिम्मक्का
- कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील, सलुमरदा थिम्मक्का हे आज देशासाठी प्रेरणास्थान आहेत.
- त्यांचे वय ११० वर्षे आहे आणि ते गेल्या ८० वर्षांपासून वृक्षारोपणाचे काम करत आहेत.
- थिम्मक्का वटवृक्षांना आपली मुले मानतात. कारण त्यांना स्वतःची मुले नाहीत.
- त्यांनी आठ हजारांहून अधिक झाडे लावली आहेत.
- यामध्ये सुमारे ३७५ वटवृक्ष आहेत.
- २०१९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
- देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी स्वतः डोके टेकवून त्यांना नमस्कार केला.
मेधा पाटकर
- महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कार्यकर्त्या मेधा पाटकर आता देशातच नाही तर जागतिक स्तरावरील एक चर्चेतील नेत्या झाल्या आहेत.
- देशात जेव्हा जेव्हा पर्यावरण रक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा मेधा पाटकर यांचे नाव यादीत अग्रभागी येते.
- सन १९७९ मध्ये सरकारने नर्मदा आणि तिच्या उपनद्यांवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला.
- या निर्णयामुळे हजारो लोकांचे तसेच मोठ्या जंगलाचे विस्थापन होणार होते.
- झाडांप्रमाणेच आदिवासींनाही पुनर्वसनाच्या समस्येला सामोरे जावे लागले.
- त्याविरोधात मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन सुरू केले. लवकरच त्यांची चळवळ लोकांमध्ये लोकप्रिय झाली.
- आजच्या काळातही देशातील पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही निर्णयावर आवाज उठवणाऱ्यांमध्ये मेधा पाटकर आघाडीवर असतात.
सयाजी शिंदे
- सयाजी शिंदे हे खरेतर अभिनेते. पण त्यांच्या संवेदनशीलतेला सभोतालच्या पर्यावरणाची होणारी हानी बोचत होती.
- त्यातूनच त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचललं.
- त्यांनी सह्याद्री देवराई ही चळवळ सुरु केली.
- उजाड माळरानांवर लोकांना सोबत घेत त्यांनी झाडे लावण्यास सुरुवात केली.
- त्यातून बीड जिल्ह्यातील डोंगरावर त्यांनी मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण, संगोपन करुन हिरवाई बहरवली.
- राज्यभरात २२ सह्याद्री देवराई, १ वृक्षबँक, १४ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण आणि आता साताऱ्यात दुर्मिळ झाडांचं उद्यान, अशी त्यांची कामगिरी आहे.
- साताऱ्यात पोलीस गोळीबार मैदानाच्या ३० एकर जागेत हा प्रकल्प साकारत आहे.
- पोलीस, वनविभाग यांच्या सहकार्याने सह्याद्री देवराई ६०० दर्मिळ वृक्ष लावत आहे.
- कुठेही मोठा वृक्ष धोक्यात आला असेल तर सह्याद्री देवराईचे कार्यकर्ते पुढे सरसावतात, तो सुरक्षित ठिकाणी नेतात. तिथं त्याचं पुनर्रोपण करुन त्याला जीवनदान देतात.
लिसिप्रिया कंगुजम
- मणिपूरमधील लिसिप्रिया कंगुजम ही जगातील सर्वात
- लहान १० वर्षांची पर्यावरण कार्यकर्त्या आहे.
- अगदी लहान वयात, लिसिप्रिया पर्यावरण रक्षणासाठी जोरदार आवाज उठवते.
- लिसिप्रियाला २०१९ मध्ये किड्स-राइट्स फाउंडेशनने आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय तिला डॉ. एपीजे अब्दुल कलाम बाल पुरस्कार आणि भारत शांतता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आला आहे.
- २०१९ साली स्पेनमध्ये झालेल्या COP25 हवामान परिषदेला तिने संबोधित केले आणि जागतिक नेत्यांना शक्य तितक्या लवकर हवामान बदलाविरूद्ध ठोस पावले उचलण्यास सांगितले.
- लिसिप्रिया कंगुजम ही आज अनेकांसाठी प्रेरणा आहे. प्रतिभा कधीच वयाची मर्यादा घालत नाही हे ती सिद्ध
करत आहे.
डॉ. गिरीश राऊत
- गेली अनेक दशकं मुंबईत पर्यावरण रक्षणासाठी सातत्यानं लढणारा लढवय्या म्हणून डॉ. गिरीश राऊत यांची ओळख आहे.
- मुंबईतील किनाऱ्यांची होणारी झीज उघडकीला आणून तथाकथित विकासाचं मॉडेल उघड पाडण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
- तसेच कोकणातील विनाशकारी प्रकल्पांविरोधातही डॉ. गिरीश राऊत सातत्यानं अभ्यासून बाजू मांडत असतात.
- कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय पर्यावरण रक्षणासाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेणारे डॉ. गिरीश राऊत एक महत्वाचे पर्यावरण लढवय्ये आहेत.
तुलसी गौडा
- कर्नाटकातील हलक्या आदिवासी जमातीतील तुलसी गौडा यांना आज जग ओळखतं.
- ७२ वर्षीय तुलसीला इनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणतात. याचे कारण त्यांच्याकडे असलेल्या वनस्पती आणि वनस्पतींचे ज्ञान आहे.
- १२ व्या वर्षांपासून रोपटे लावणाऱ्या तुलसी यांनी आतापर्यंत ३० ते ४० हजार झाडे लावली आहेत.
- त्यांना २०२१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
- पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी तुलसी त्यांच्या पारंपरिक आदिवासी पोशाखात राष्ट्रपती भवनात अनवाणी पोहोचल्या होत्या.