मुक्तपीठ टीम
नवी मुंबईतील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंगसंबंधित धक्कादायक घटना घडली आहे. चार सिनियर वर्गातील विद्यार्थ्यांनी एका ज्युनिअर वर्गातील विद्यार्थ्याला दारू पाजली आणि त्याला पॅंटमध्येच लघवी करायला भाग पाडले. नवी मुंबईतील या घटनेमुळे पुन्हा एकदा रॅगिंग सारखा गंभीर मु्द्दा चर्चेत आला आहे. रॅगिंगविरुद्ध सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठ अनुदान आयोगाने यापुर्वी अनेक वेळा निर्देश दिलेत. महाराष्ट्र शासनाने कायदा केला आहे. प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगविरुद्ध समिती असूनही रॅगिंगच्या घटना उघडकीस येतात. त्यामुळे समजून घ्या कायदा काय सांगतो आणि कशी करावी तक्रार…
रॅगिंग म्हणजे काय?
- एखाद्या विद्यार्थ्याकडून किंवा ग्रुपकडून दुसऱ्या विद्यार्थ्यांना इतरांसमोर अपमानास्पद वागणूक देणे.
- छळ करणे.
- एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मनाविरुद्ध कृत्य करण्यास भाग पाडणे.
- त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण करणे.
- कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचवणे.
- सुरुवातीला रॅगिंग (ragging)हा प्रकार छोट्या गोष्टींनी सुरू झाला होता. त्यात ओळख करुन देण्याचा उद्देश होता. त्यानंतर त्याचे स्वरुप गंभीर होऊ लागले.
- सगळ्यांसमोर नाचायला, गायला लावणे, कोणालाही शिव्या द्यायला लावणे, मुला-मुलीला प्रपोज करणे, छेड काढणे, शिक्षकांची टिंगल किंवा खोड्या करायला सांगणे, काही तरी खाण्या-पिण्यास सांगणे / अमली पदार्थाचं सेवन करण्यास सांगणे, अश्लील दृक्श्राव्य फिती पाहावयास सांगणे, अश्लील कृतीत सहभाग घ्यावयास सांगणे, शारीरिक इजा पोहोचवणे असे प्रकार सुरु झाले.
रॅगिंगविरोधात कायदा-
न्यायालयाच्या आदेशानुसार यूजीसीने रॅगिंग (ragging)प्रतिबंधक कायदा आणि नियमावली तयार केली आहे.
- रॅगिंगविरोधी पथक करावे.
- महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंगविरोधी विभाग/समिती नेमावी.
- सीसीटीव्ही कार्यान्वित करावे.
- विद्यापीठांनी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
- विद्यार्थ्यांशी नियमित सुसंवाद, मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत.
- माहितीपत्रकात रॅगिंगविरोधी सूचना द्याव्यात.
- वसतिगृहे, कँटीनमध्ये भेट द्यावी.
रॅगिंग केल्यास शिक्षा कोणती?
- जी कोणी व्यक्ती शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या बाहेर एखाद्या विद्यार्थ्याला रॅगिंग करत असेल, ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीला साथ देणारे आणि रॅगिंगचा प्रचार करणारे सर्व विद्यार्थी यामध्ये दोषी धरले जाऊ शकतात.
- यासंदर्भात अपराध सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंतच्या कारावासची शिक्षा होऊ शकते.
- तसेच दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
इथे करावी तक्रार-
- १८००-१८०-५५२२ या टोल फ्री क्रमांकावर २४ तास तक्रार करता येऊ शकते.
- helpline@antiragging.in यावर मेल करुन तक्रार दाखल करता येऊ शकते.