मुक्तपीठ टीम
अंबानी स्फोटके प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक आणि ठाकरे सरकारला हल्लाबोल करत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक प्रश्न विचारला आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.
सोमय्या यांनी आघाडी सरकारचा संशयास्पद भूमिकेवर कोरडे ओढलेत. “मी तुम्हाला सांगतो या प्रकरणात बेजबाबदारपणा खूप झाला आहे. सचिन वाझे हा कोण एवढा महान आहे? एका एपीआयसाठी अजय मेहताच्या नेतृत्वाखाली एक पुनरावलोकन समिती नेमली गेली. ज्यावेळी महाराष्ट्र १०० टक्के लॉकडाउनमध्ये होता. जून महिन्यात एका साधारण एपीआयसाठी अजय मेहताच्या नेतृत्वात समिती नेमली.”
ते पुढे म्हणाले, “मला शरद पवार यांना प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळी ३ मार्च २००४ रोजी सचिन वाझे निलंबित झाले होते. तेव्हा गृहमंत्री राष्ट्रवादीचेच होते. २००७ मध्ये राष्ट्रवादीचे गृहमंत्री त्यांचा राजीनामाही स्वीकारत नाहीत. तेव्हाही राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते. मग आता २०२० मध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेमध्ये असं काय सापडलं? की त्यांनी समिती नेमली आणि त्यांनी तो समितीचा अहवाल स्वीकारून त्यावर स्वाक्षरी केली.”असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.”
सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला आहे, “त्यांना वसुली करायला माणूस हवा आहे. सरकार माफियागिरी करतंय. असा टोलाही त्यांनी यावेळी मारला.”
आघाडी सरकारच्या गृह विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महत्वाचे मुद्दे मांडत खळबळजनक गौप्यस्फोट केले.
एपीआयसाठी आयुक्तांच्या चकरा का?
• एक एपीआय क्राईम ब्रांचची गाडी घेऊन फिरतो आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह तीन दिवस त्यासाठी चकरा मारतात.
• पोलीस आयुक्तांनी एपीआयासाठी चकरा मारण्याचं मला एक उदाहरण शरद पवार यांनी दाखवावं.
• म्हणजेच याचा अर्थ वाझे प्रकरणात आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी दिसत आहे.
• वाझे हा राज्य सरकारचा खास माणूस असल्याचे सिद्ध होत आहे.
सचिन वाझे स्पेशल कामांसाठीचा माणूस!
• सचिन वाझेंचे अनेक कंपन्यासोबतच्या व्यवहारासंबधीची माहिती मी काल लोकांसमोर ठेवली आहे.
• त्यामध्ये शिवसैनिक भागीदार आहेत.
• दुसरी गोष्ट ५० कोटींची खंडणी
• सचिन वाझेचा उपयोग स्पेशल कामांसाठी उद्धव ठाकरे करायचे.
• सरकार माफियागिरी करतंय आणि पैसे बनवणं हेच या सरकारचं काम आहे.
• सचिन वाझे हा त्यासाठी चांगला माणूस आहे.