गौरव पाटील
भारतीय नौदलातील एका अधिकार्याचे पालघर जिल्ह्यातील वेवजी तलासरी येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. हे सर्व प्रकरण अपहरण व खंडणीचे नसून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या निष्कर्ष जवळ पालघर पोलीस पोहोचले आहेत.
5 फेब्रुवारी रोजी सुमारे 90 टक्के भाजलेल्या अवस्थेत सुरज कुमार दुबे या नौदलातील अधिकाऱ्याने आपल्याला खंडणीसाठी अपहरण करून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे मृत्यू पूर्व जबानीत फिर्याद घोलवड पोलिसांकडे दिली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले होते. याप्रकरणी पालघर पोलिसांनी डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार करून विविध ठिकाणी तपास केला.
या फिर्यादेत 30 जानेवारी रोजी चेन्नई विमानतळाच्या बाहेरहून आपले अज्ञात इसमाने अपहरण केल्याचे म्हटले होते. मात्र चेन्नई विमानतळ तसेच विमानतळाजवळ असलेल्या एक हॉटेल मधील व एका बस स्टॅन्ड येथील सीसीटीव्ही फुटेज पाहता मृत अधिकारी मुक्तपणे वावरत असल्याची पुरावे प्राप्त झाल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्याचप्रमाणे 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी यादरम्यान या नौदल अधिकाऱ्याने चेन्नई- वेल्लोर दरम्यान प्रवास करून वेल्लोर येथील काही हॉटेलमध्ये एकट्याने अधिवास केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याचप्रमाणे एकट्याने एटीएम मधून पैसे काढल्याचे देखील पोलिसांकडे पुरावे आहेत.
शेअर बाजारांमध्ये सुमारे पावणे अठरा लाख रुपयांची गुंतवणूक केलेला हा अधिकारी शेअर व्यवहारात पूर्णपणे बुडून गेला होता. त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्र परिवार तसेच लग्न ठरल्या नंतर सासऱ्या कडून मोठ्या रकमेची कर्ज घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शेअर बाजाराच्या व्यवहारासाठी वापरात असलेल्या तिसऱ्या ब्राह्मणद्वानी तसेच शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची अथवा कर्जबाजारी झाल्याची मृतांची कोणत्याही नातेवाईकांना माहिती दिली नसल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
मृत अधिकाऱ्याने आपल्या फिर्यादीत म्हटल्या प्रमाणे ४ फेब्रुवारीच्या रात्रीत एका वाहनातून आपल्याला चेन्नईहून तलासरी येथे आणण्यात आले असे नमूद केले असले तरी १५०० किलोमीटरचा प्रवास करण्यास किमान 25 ते 26 तास लागत असल्याने फिर्यादी मध्ये नमूद केलेले बाबी व प्रत्यक्ष तपासामध्ये पुढे आलेल्या माहिती मध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. महिना भराच्या सुट्टीचा कालावधी साठी आलेल्या या अधिकाऱ्यांनी तेरा बँकांमधून मोठ्या रक्कमेच्या कर्जासाठी चौकशी केल्याचे ‘सिबिल’ कडून माहिती प्राप्त झाली आहे. शेअर बाजारात झालेला तोटा व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या दिशने तपासाची दिशा सरकली आहे. तलासरी नाक्यावर असलेल्या पेट्रोल पंप वरून 5 फेब्रुवारीच्या पहाटे एका व्यक्तीं दोन प्लास्टिक बॉटल मध्ये डिझेल घेतल्याचे चित्रफित पोलिसांना प्राप्त झाले असून त्याची प्रतिमा मृत अधिकाऱ्याशी मिळत आहे. त्यामुळे खंडणी व अपहरणाच्या दिशेने सुरु असलेला पोलिस तपास आत्महत्याकडे वळल्याचे प्राथमिक निष्कर्षातून पुढे आल्याचे पालघर पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.