मुक्तपीठ टीम
मुंबईतील एका अल्पवयीन मुलाचे तेरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, मुंबईतील मालाड पोलिसांनी जलदगतीनं तपास करून अपहरणाचा छडा लावला. दोन अपहरणकर्त्यांना अटक करून मुलाची सुटका केली आहे.
मालाड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खास टीम तयार करण्यात आल्या. त्या टीमनी सभोवतालच्या परिसरातील खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. त्यांच्याकडून त्यांना महत्वाची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार तपास वेगानं पुढे नेण्यात आला.
काही मिनिटातच अपहरण झालेला मुलगा व एक आरोपी दिव्यांशू माताभिक विश्वकर्मा यांना कांदिवली पश्चिम मधील कांतीलाल माखिजा मैदानात ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा आरोपीला शेखर अंगनू प्रसाद विश्वकर्मा याला कांदिवली पश्चिम येथील आंबावाडी लिंक रोडवर पकडण्यात आले.
अशाप्रकारे अपहरण झालेल्या मुलाची गुन्ह्याची माहिती मिळाल्यापासून दोन तासाच्या आत सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. पोलिसांच्या या जलदगती तपासाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.