मुक्तपीठ टीम
कोरोनाची महामारी हे मानवतेवरीलच संकट आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात जात-भाषा-धर्म-प्रांत-देश अशा साऱ्या भिंती गळून एकमेकांना माणुसकीच्या नात्यानं मदत करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याची जाणीव ठेवत आपल्या देशात, महाराष्ट्रात अशी अनेक संस्था आणि माणसं गरजूंना मदतीचं पुण्याचं काम करत आहेत. अशांपैकीच एक म्हणजे आपल्या सातारा शहरातील खिदमत ए खलक संस्था. सातारा शहरातील मुस्लिम बांधवांची ही सामाजिक संस्था कोरोनाग्रस्तांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला पुढे सरसावली आहे.
कुठल्याही राजकीय पक्षाशी संबध नसताना फक्त समाज सेवेचा वसा हाती घेऊन ही संस्था कोरोनाबाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबियांसाठी मदतीची पहाट घेऊन आली आहे. गरजूंना पाणी वाटपापासून ते त्यांच्या दोन वेळच्या जेवणाच्या सोयींपर्यंत सर्व प्रकारची मदत केली जात आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात करीत असलेल्या या कामात त्यांनी आपली धन्यता मानली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यासाठीही संस्थेचे स्वयंसेवक काम करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील एका कोरोना रुग्णांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संस्थेचे स्वयंसेवक पोहचले. नातेवाईकांप्रमाणेच ते कार्य करण्यात आले.
खिदमत ए खलक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सातारा शहरात नव्याने स्थापन झालेल्या ह्या संस्थने एक नवीन आदर्श उभा केला आहे. साजिद शेख , सादिकभाई शेख, मुबिन महाडवाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे. संस्थेमधील आरिफ खान, सलीम भाई, आसिफ खान, हाफिज मुराद, मोहसीन पेंटर, पिंटूशेठ, अज्जुशेठ कच्छी व अबिद बारदान या समाज सेवकांच्या कार्यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
पाहा व्हिडीओ: