मुक्तपीठ टीम
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या खो-खो संघांनी सुवर्णपदके जिंकली. दोन्ही संघांनी सर्वसाधारण विजेतेपदक पटकावले. अंतिम सामन्यात ओरिसाच्या संघांचा पराभव केला. मुलींमध्ये तिसऱ्या स्थानावर पंजाब व पश्चिम बंगाल राहिला. मुलांमध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्लीला कांस्यपदक मिळाले.
स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी सुवर्ण पदके पटकावून मान उंचावली. मुलींचा अंतिम सामना ओरिसासोबत झाला. अत्यंत उत्कंष्ठावर्धक झालेला सामना महाराष्ट्राने (८-६, ७-९, ६-५ : २१ विरूद्ध २०) एक गुणाने जिंकला. ओरिसाने सुरूवातीपासून महाराष्ट्राला चांगली लढत दिली.
शेवटच्या २० सेकंदात सुवर्ण
ओरिसाने जास्तीच्या डावात पाच गडी बाद करून चुरस निर्माण केली होती. सामना संपण्यासाठी एक मिनिट बाकी असताना श्रेया पाटीलने नाबाद खेळी केली. अगदी २० सेकंद उरली असताना अटीतटीचा प्रसंग ओढावला होता. परंतु तिने उत्कृष्टपणे नाबाद खेळी करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. व्यवस्थापक सुधीर चपळगावकर, चीफ कोच राजेंद्र साप्ते, प्रशांत पवार, सत्येन जाधव यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.