मुक्तपीठ टीम
पुण्यात गरिबांचा डॉक्टर उपक्रम चालवणाऱ्या सोहम ट्रस्टने खराटा पलटन तयार केली आहे. त्यांनी या पलटनला सफाईची जबाबदारी देण्याचा प्रस्ताव पुणे मनपाला दिला होता. आता मनपाने सफाईसाठी या पथकास भवानी पेठेची जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘गरिबांसाठी डॉक्टर’ चालवणाऱ्या सोहम ट्रस्टने खराटा पलटनची स्थापना केली होती. या उपक्रमाची सुरूवात डॉ. अभिजीत सोनवणे यांनी केली. गरिबांना जीवन जगण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. डॉ. सोनवणे यांनी असे पाहिले की, ज्या भागांमध्ये गरिब लोकं जास्त असतात तो परिसर अस्वच्छ आढळतो. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाचा विचार करता स्वच्छता राखण्याची गरज वाढली आहे, यामुळे डॉ. सोनवणे यांनी खराटा पलटनची स्थापना केली.
लिंक क्लिक करा – पाहा व्हिडीओ
३५ गरिब लोकांच्या गटाने शहरातील विविध भागात साफसफाई सुरू केली होती. डॉ सोनवणे यांनी सदस्यांना कामाच्या अनुषंगाने प्रत्येकी १००-२०० रुपये दिले. त्यानंतर संघटनेने पुणे महानगरपालिकेला संपर्क साधला आणि त्यांना सोबत घेण्यास सांगितले. योग्य विचार केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने या सदस्यांना सोबत घेतले.
घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणारे पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी घाडगे या म्हणाल्या,”एखाद्या विशिष्ट भागाचे वाटप करण्याच्या मागणीसाठी या समूहाने आमच्याकडे संपर्क साधला होता. आम्ही त्यांना भवानी पेठ वॉर्ड कार्यालयात कार्य करण्यास सांगितले. सुरुवातीला सेव्हन लव्हज चौकातील परिसराचे वाटप करण्यात आले होते नंतर त्यांना भवानी पेठेतील काशेवाडी झोपडपट्टी सोपविण्यात आली. त्यांच्या प्रयत्नात त्यांना पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी मदत करणार आहेत.”
या मोहिमेविषयी डॉ. सोनवणे म्हणाले,“दर शुक्रवारी खराटा पलटनची टीम काशेवाडी झोपडपट्टीसमोरील संपूर्ण भाग स्वच्छ करणार आहे. कामामुळे त्यांना पैसे, सन्मान दोन्ही मिळतील आणि ही परिस्थिती बदलेल अशी आशा आहे.