मुक्तपीठ टीम
जनादेश खुंटीवर टांगून बळकावलेली सत्ता गेल्यामुळे नैराश्य आलेल्या महाविकास आघाडीला विरोधकाची भूमिकाही जमत नसून त्यातून आलेल्या नैराश्यातून १७ डिसेंबरचा मोर्चा घोषित करण्यात आला अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याने महाराष्ट्राला संकटांच्या खाईत ढकलणाऱ्या ठाकरेंना आता सीमावादावर कंठ फुटला असला तरी सत्तेत असताना याच प्रश्नावर अंग झटकून वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी त्यांनी केली तेव्हा हे उसने अवसान कोठे गेले होते, असा सवालही केशव उपाध्ये यांनी केला.
सीमाप्रश्न सोडवण्याची आमची तयारी आहे अशी पोकळ गर्जना उद्धव ठाकरे यांनी केल्याच्या आज प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या हास्यास्पद असून सत्तेत असताना ज्यांनी हा वाद केंद्रावर ढकलला ते आता फुशारक्यांपलीकडे काय करणार असा टोलाही केशव उपाध्ये यांनी हाणला. “महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील वादग्रस्त भागाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा जो निकाल येईल तो स्वीकारू, पण तोवर हा भाग केंद्रशासित करावा” अशी मागणी ठाकरे यांनी केली होती, या माहितीकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले. सत्तेत असताना सतत केंद्र सरकारकडे हात पसरणारे, प्रत्येक प्रश्न केंद्राकडे ढकलून रडगाणे गाणारे आणि प्रत्येक जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलणारे ठाकरे आता सत्ता गेल्यावर आणि पक्ष संपल्यावर उसने अवसान आणून पोकळ वक्तव्ये करत सुटले आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी दर्पोक्ती २०२१ मध्ये करणाऱ्या ठाकरेंचा सूर सत्तेवर येताच बदलला, आणि नाकर्तेपणाची जाणीव झाल्यावर जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी वादग्रस्त भाग केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न करून पाहिला. मुख्यमंत्री असूनही कोणतीच जबाबदारी न घेता, तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या असे जनतेला सांगणाऱ्या ठाकरे यांनी सीमावादातून पळ काढला होता, आणि आता सत्ता, पक्ष काहीच हाती नसताना पुन्हा तोंड उघडले आहे. सत्ताभ्रष्ट झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच असे प्रकार घडतात, असेही केशव उपाध्ये म्हणाले.
येत्या १७ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. अधिवेशन नागपुरात असताना मोर्चा मुंबईत काढण्याचे आघाडीचे नियोजन पाहता, मोर्चाची जबाबदारी ठाकरेंच्या उरल्यासुरल्या पक्षावर ढकलून बघ्याची भूमिका घेण्याचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा डाव स्पष्ट दिसतो. आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते असलेले ठाकरे महामोर्चा काढायला निघाले हाच मोठा विनोद आहे, असेही ते म्हणाले. सत्तेवर असताना महाराष्ट्राचे हित साधणे जमले नाहीच, आता विरोधात बसून राज्याचे अहित तरी करू नका, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला.
१७ डिसेंबरचा मोर्चा हा वैफल्यग्रस्तांचा असल्याची खोचक टिप्पणी केशव उपाध्ये यांनी केली. मोर्चा काढण्याआधी महाराष्ट्राचा अपमान करणा-या तत्कालिन सरकारमधील घटक पक्षांनी काही गोष्टींचा खुलासा करावा, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले. सत्तेत असताना महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होत असताना, अन्य राज्ये बळीराजाला मदत करीत असताना शेतक-यांना एक पैशाचीही मदत न करताना, धनदांडग्यांना, मद्य विक्रेत्यांना सवलत देताना महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्याचा खुलासा करा असे केशव उपाध्ये यांनी ठणकावून सांगितले.
सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांवर जे हल्ले केले, या हल्ल्यांमागे पाठीमागून फूस लावण्याचे काम काँग्रेस व जेडीएस करत असल्याचा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला.