मुक्तपीठ टीम
केरळ उच्च न्यायालयाकडून अभिनेत्री तामन्ना भाटिया, इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेता अजु वर्गीज यांना नोटिस पाठवली आहे. हे तिघे एमपीएल- मोबाइल प्रीमियर लीग या ऑनलाईन रम्मी गेमचे ब्रँन्ड अँबेसिडर आहेत. हा एक ऑनलाईन गेम आहे. अशा ऑनलाइन गेमवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. त्यातच सोशल मीडियावरही गदारोळ माजला आहे. त्यामुळे या गेमच्या ब्रँन्ड अँबेसिडर्सवर ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्याचे आरोप करत केरळ उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीही मद्रास उच्च न्यायालयानेही अशीच नोटीस बजावली आहे.
ऑनलाइन रम्मी गेममध्ये अनेकांनी मोठ्या प्रमाणावर पैसा गमावला आहे. आजवर अनेकांनी याविरोधात आवाजही उठवला आहे. ऑनलाइन गेम कंपन्यांनी कोरोना संकट काळात लोक घरी असल्याचा फायदा घेत टीव्ही चॅनल्सवर आक्रमकरीत्या जाहिरात मोहिमा चालवल्या. घरी रिकामे असलेल्यांपैकी अनेकांना भुरळ पडल्याने त्यांनी गेम खेळले आणि पैसेही गमावले. काहींनी काही हजार तर काहींनी चक्क २०लाखही गमावले. अशा पैसा गमावलेल्यांनी न्यायालयाच्या नोटीसचे स्वागत केले आहे.
ऑनलाइन गेमच्या जाहिरातबाजीवर बंदीची मागणी
या गेमचे ब्रँन्ड अँबेसिडर लोकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. लोक त्यामुळे या गेमकडे वळतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे ह्युमन राइट असोसिएशनचे जयेश मिराणी यांनी म्हटले आहे. मुंबईतील पंचशील सेवा संघ या सेवाभावी संस्थेचे नवीन लादे यांनी मुळातच सरकार अशा ऑनलाइन जुगाराला जाहिरातीच कशा करु देते असा प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व चॅनल्सवर जुगाराच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घालावी, असे पत्रही आपण लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वेळ आली तर मी या प्रकरणी न्यायालयातही जाणार आहे, असेही लादे म्हणाले.
जुलै २०२० मध्ये विराट कोहली, तमन्ना भाटिया आणि अजू वर्गीज यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात चेन्नईतील एका वकिलाने याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय मद्रास न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारकडून उत्तरही मागवले आहे.
काही दिवसांपूर्वी तिरुअनंतपुरम येथे राहणाऱ्या २७ वर्षीय विनीत याने २१ लाख रुपये गमावल्यानंतर आत्महत्या केली होती. या घटनेनंतर या गेमवर बंदी घालण्याच्या मागणीला जोर देण्यात आला होता. तसेच तेलंगणा राज्यात ऑनलाइन रम्मी खेळावर यापूर्वीच बंदी घातली आहे.
उपराष्ट्रपतींनीही घेतली तक्रारींची दखल
ऑनलाइन रम्मी गेमवर बंदी घालण्याचा मुद्दा सर्वप्रथम राज्यसभेत उपस्थित केला होता. राज्यसभेतील काही सदस्यांनी या गेमबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की, पैशाच्या लालसेने या गेमची तरुणांना भुरळ पडत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सभापती एम. वेंकैया नायडू यांनी कायदामंत्र्यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आदेश दिले होते.
Muktpeeth is doing very good job by exposing unearth facts.