मुक्तपीठ टीम
हिंदूंचं जगातील सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे काशी. श्री काशी विश्वनाथ मंदिर, गंगा घाट यामुळे काशीचं महत्व वेगळंच. मात्र, शतकानुशतकांची परंपरा असणाऱ्या हिंदूंच्या या सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्राची स्थिती फार काही चांगली नव्हती. काशीचं जे स्थान आहे तसाच काशीचा विकास घडवण्यासाठीच काशी कॉरिडॉरची योजना आखली गेली. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक खासदार असल्यानेही या योजनेला वेगळीच गती मिळाली.
श्रीकाशी विश्वनाथ मंदिर बांधकाम ५५% पूर्ण झाले आहे. या बांधकामाला सुमारे २७ महिन्यांचा कालावधी लागला आहे. उर्वरित ४५% नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलदगतीने काम सुरू आहे. मंदिराची रचना जवळजवळ तयार आहे. फिनिशिंगचे काम चालू आहे.
सात प्रकारच्या खास दगडांचा वापर करून कॉरिडॉरला भव्य रुपात उभारण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी कारागिर रात्रंदिवस काम करत आहेत. त्याचबरोबर, काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये बालेश्वर दगड,मार्बल, कोटा ग्रॅनाइट आणि मॅडोना दगड देखील वापरण्यात येत आहेत, जे आगामी काळात देशी-विदेशी पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ मार्च २०१९ रोजी श्रीकाशी विश्वनाथ मंदिराची पायाभरणी केली होती. कॉरिडॉरवर त्यावेळी सुमारे ३३९ कोटी रुपये खर्च करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, नंतर वाढवून सुमारे ८०० कोटी रुपये करण्यात आले. श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा म्हणाले की, मंदिर परिसर ३३,७०५ चौरस फूट मध्ये बनविला जात आहे. संपूर्ण कॉरिडॉर ५,२७,७३० चौरस फूट जागांवर बांधला जात आहे.
यासाठी आतापर्यंत ३१४ भवनांचे अधिग्रहण झाले आहेत. कॉरिडॉरचे बांधकाम ऑगस्टमध्ये पूर्ण होणार होते. पण कोरोनामुळे ते लांबणीवर गेले आहे. आता १५ नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.