रोहिणी ठोंबरे
कारवी….. हा शब्द ट्रेकर्सना नवखा नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही वनस्पती म्हणजे सह्याद्रीचं सोनचं… सात-आठ वर्ष उंचच उंच वाढणारी ही झुडपं डौलत असतात आणि आठव्या वर्षी सगळी झाडं एकाच वेळी फुलतात. महाराष्ट्रातील रतनगडावर यावर्षी कारवीचा पुष्पोत्सव बहरला आहे. कारवीची ही सुंदर दृश्य मुंबईच्या सह्य भटकंती या टीमने आणि प्रसाद काळे यांनी क्षणोक्षणी टिपली आहेत.
उन्हाळ्यातही यांच्या छायेतून फिरताना उन्हाचे चटके जाणवत नाहीत. एवढंच काय तर डोंगर उतारावरून मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत हीच झाडं उभी असतात.
कारवीच्या मुळांमुळे जमिनीची धूप आटोक्यात येते. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळं पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्थर वाढवायला हातभार लावतात. याच कारवीच्या दाट गर्दळीत आश्रयाला वाढतात अनेक ऑर्किड आणि लिलीची झुडपं. त्यांचं गुरांपासून संरक्षण ही कारवी करते. कारवीची पानं जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगी पडतात. तर याच कारवीच्या झुडपांवर अनेक कीटकांना खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते. या कारवीचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे तिचा एकत्रित बहर म्हणजेच mass flowering…ही झाडं सलग सात वर्ष वाढतात आणि आठव्या वर्षी सगळी झाडं एकाच वेळी फुलतात.
जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा डोंगर उतारांना जांभळ्या रंगाच्या टपोऱ्या फुलांच्या छटा दिसतात. मधमाश्या बहराच्या वेळी कारवीवर डेरा देऊन बसतात. अधिक दाट-गडद रंगाच्या कारवीच्या मधाची बाजारात चढ्या भावाने विक्री होते. कारवी जंगल संवर्धनासाठी अप्रत्यक्षरीत्या का होईना पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरला, की कारवीची बोंडं सुकतात. या बोंडांवरचा चिकट द्रवपदार्थ गुरांना आवडतो. बोंडामधील बिया पक्व झाल्या, की प्रजननाची जबाबदारी पूर्ण केलेली ही झाडं आठ वर्षांची तपश्चर्या पूर्ण करून आपला जीवनकाळ संपवतात.
कारवीचा होणारा उगम आणि त्याचा होणारा उपयोग!
- कारवीचा बहर तसा दोन-तीन आठवडे टिकतो, ऊन वाढू लागलं, की फुलं करपून जातात आणि बहर ओसरू लागतो.
- जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने हे बोंडे तड तड आवाज करत फुटतात आणि त्या झटक्याने आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात.
- बहरामध्ये इतक्या बिया विखुरल्या जातात, की भलेही काही बिया कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडल्या, तरी नव्या फुटीसाठी मुबलक बिया शिल्लक राहतात.
- कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठीही करतात. कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीही वाढतात.
या बहुपयोगी कारवीचा दर आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा आगळावेगळा पुष्पोत्सव मन भरून पाहण्यासाठी एकदा तरी जायलाच हवं. पुढच्या आठ वर्षांत आयुष्यात, पर्यावरणात काय काय बदल घडतील सांगता येणार नाही. त्यामुळे या वर्षी हे निसर्गवैभव मनसोक्त अनुभवता यावं.. ही मिळकत हा अनुभव आयुष्यभारासाठी पुरणारा आहे, सह्याद्रीतील प्रत्येक भटक्याला आयुष्यात निदान एकदा तरी सह्याद्रीचे हे गोंडस रूप अनुभवता यावं…नजर जाईल तिथं जांभळं कोंदण. कारवीच्या बहराचं सौदर्य शब्दांत मांडता येणं कठीणचं.. ते प्रत्यक्ष अनुभवायला हवंच.
सह्य भटकंती टीममध्ये सुशिल परब, ज्ञानेश्वर नाईक, सुदेश परब, अजय म्हात्रे, गणेश मोरे, नवनाथ पार्टे, सुमित्रा कसबले, स्वप्निल चव्हाण, सुवर्णा सातपुते आणि केदार चवरकर या सर्वांचा समावेश आहे.