मुक्तपीठ टीम
काँग्रेस ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षाच्या मदतीने आता कपिल सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. कपिल सिब्बल यांनीही अपक्ष म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी केली आहे.
सपा नेते अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत कपिल सिब्बल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नामांकनानंतर कपिल यांनी सांगितले की, मी १६ मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. मी आता काँग्रेसचा नेता नाही. मागच्या वेळीही मी यूपीतून राज्यसभेवर गेलो होतो. मोदी सरकारविरोधात विरोधक मोर्चेबांधणी करत आहेत. त्यात त्यांना भूमिका पार पाडायची आहे.
यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, सपाला कपिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे. कपिल सिब्बल यांनी आपले म्हणणे चांगले मांडले आहे. कपिल सिब्बल हे एक यशस्वी वकील आहेत. दरम्यान समाजवादी पक्षाने आज आपले राज्यसभेचे उमेदवार निश्चित केले. सपाने कपिल सिब्बल यांना पाठिंबा दिला, तर अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव राज्यसभेवर जाणार आहेत.
याशिवाय पक्ष जावेद अली खान यांनाही राज्यसभेवर पाठवत आहे. ते यापूर्वी सपाचे राज्यसभा सदस्यही होते. आतापर्यंत राज्यसभेत सपाचे पाच सदस्य असल्याची माहिती आहे. यामध्ये कुंवर रेवती रमण सिंह, विशंबर प्रसाद निषाद आणि चौधरी सुखराम सिंह यादव यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपत आहे.