मुक्तपीठ टीम
माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी पालकांसाठी एक अमूल्य असा सल्ला दिला आहे. लहान मुलांपासून कोणत्या गोष्टी दूर ठेवाव्यात आणि कोणत्या त्यांना गोष्टी करू दिल्या पाहिजेत याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोबाईल दूर ठेवून त्यांना खेळू दिल्याने लठ्ठपणा टाळता येऊ शकतो, असे ते म्हणतात. भारताचा माजी विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव भारतात टाइप-२ मधुमेह आणि लठ्ठपणाबद्दल जागृतीपर कार्यक्रमात हे बोलत होते. भारतातील एका जागतिक आरोग्य सेवा कंपनीने ‘ब्रेक द पार्टनरशिप’ सुरू करण्यासाठी कपिल देव यांच्यासोबत भागीदारी केली आहे. यावेळी, आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोण-कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचे अनुसरण केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
कपिल देव म्हणतात की, “मला हे कोणाला सांगण्याची गरज नाही, लोक हुशार आहेत. पण, कधी कधी त्यांना माहिती नसते. भारतीय मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दिवसातून काही तास फोन दूर ठेवून त्यांना मैदानात खेळू दिल्याने त्यांचे आरोग्यही स्वस्थ राहील आणि याचा फायदाही होईल.”
टाइप-२ मधुमेह टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
- या मोहिमेचे उद्दिष्ट मधुमेह असलेल्या लोकांना, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना टाइप-२ मधुमेहामधील वजनाच्या गंभीर परिणामांबद्दल शिक्षित करणे आहे.
- भारतात टाइप-२ मधुमेह असलेले ६७ टक्के लोक लठ्ठपणाशी झगडत आहेत.
- एक किलो वजन जर कमी केल्यास HbA1c ०.१ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदय, मूत्रपिंड आणि हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो आणि रुग्णाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
भारतीयांमध्ये मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रूग्णांचे प्रमाण मोठे आहे. भारतात दरवर्षी ६ लाखांहून अधिक लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू होतो. मधुमेहाने ग्रस्त लोक त्यांचे वजन नियंत्रित करू शकत नाहीत यामुळे परिस्थिती आणखी वाईट होते.
या मोहिमेची घोषणा करताना, नोवो नॉर्डिस्क इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर कपिल दे म्हणाले, “मधुमेहाच्या विरोधात लढण्याच्या प्रयत्नात नोवो नॉर्डिस्कसोबत हातमिळवणी करताना मला आनंद होत आहे. मधुमेह आणि वजन यांचे नाते हे क्रिकेटमधील दोन फलंदाजांमधील भागीदारीसारखे आहे. विरोधी संघासाठी खूप हानीकारक असू शकते आणि गोलंदाजाला नेहमी ते लवकरात लवकर संपवायचे असते.“