मुक्तपीठ टीम
विविध क्षेत्रात राज्यभर आघाडीवर राहून कर्मयोगाचा झेंडा अटकेपार लावणारे पनवेल येथील दै. निर्भीड लेखचे संपादक, कवी, गजलकार, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या कार्याची दखल घेत स्व. मधुकरशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि आ. भाई जगताप मित्र मंडळाच्यावतीने ‘कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार असल्याची घोषणा ठाकूर ट्रस्टचे अध्यक्ष उमेश ठाकूर आणि भाई जगताप मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संयुक्तिकपणे केली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.
राज्याच्या राजशिष्टाचार मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे, सुनील तटकरे, मुंबई कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत अलिबाग येथील सार्तिजे येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन उमेश ठाकूर यांनी केले असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. यावेळी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच गुणवंत, यशंवत आणि कीर्तीवंत मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल.
कांतीलाल कडू यांनी कोरोनासह राज्यभर आरोग्य विभाग आणि खासगी दवाखाने चालकांवर आसूड ओढून रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फार मोठा दिलासा दिला आहे. तसेच दोन हजाराहून अधिक कोरोना रूग्णांना आपल्याच कुटूंबातील सदस्य मानून त्यांच्यावर उपचार करण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे.
कडू हे रायगडसह महाराष्ट्राला पत्रकारितेत वेगळा मापदंड देणारे जहाल संपादक म्हणून परिचित आहेत. रोखठोक भूमिका आणि तितकेच पारदर्शक लिखाण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. गेली २८ वर्षे ते पत्रकारितेत वाजत-गाजत आहेत. दै. निर्भीड लेखमधून अनेक बदमाशांना ते वठणीवर आणत आहेत. तर भ्रष्ट यंत्रणेला जळी, स्थळी, काष्टी, पाषणी ते दिसत असल्याचा दराराही त्यांनी निर्माण केला आहे.
शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातही कांतीलाल कडू यांचे आदबीने नाव घेतले जात आहे, असे त्यांनी कार्य उभारले आहे. अनेक आंदोलनातून त्यांनी राज्य सरकारला वठणीवर आणले आहे. कर्नाळा बँक प्रकरणाच्या तपासाला केवळ कडू यांच्यामुळे चालना मिळाली असून ईडीची कारवाई ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. ठेविदारही त्यांच्यावर विश्वास ठेवून आहेत.
कांतीलाल कडू यांनी सांस्कृतिक क्षेत्रात पनवेलला आघाडीवर ठेवले आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरच्या गायकांचे कार्यक्रम आयोजित करून रसिक, श्रोेते, कानसेनांना तृप्तीची अनुभूती दिली आहे. कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या २२ जानेवारीला राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाचे पनवेल येथे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांचा आज कुलाबा जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान होत आहे. यापूर्वी त्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘कोरोना योद्धा’, आ. दत्तूशेठ पाटील शैक्षणिक संस्थेच्यावतीने ‘कोरोना देवदूत’, पनवेल भूषण, पनवेल गौरव, समाजरत्न, उत्कृष्ट पत्रकारितेचा पाटील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय शेकडो पुरस्कारांनी त्यांच्या कार्याला सलाम ठोकला आहे.
चारोळ्यांचा निःश्वास, भावस्पर्श हे त्यांचे चारोळी संग्रह प्रकाशित आहेत. उग्रलेख हे निवडक अग्रलेखांचे पुस्तक त्यांचे गाजले आहे. जीवन प्रवासावर विश्वाचे आर्त हा पहिला भागही पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. तर आजानुबाहू हा कविता संग्रह अशी पाच पुस्तके त्यांची गाजत आहेत. त्यांना आज कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.