मुक्तपीठ टीम
सांगलीत पानपट्टी चालवणाऱ्याच्या मुलीने खेलो इंडिया स्पर्धत सुवर्णपदक पटकावले आहे. वेटलिफ्टिंग खेळात काजोल महादेव सरगर हिने ४० किलोखालील वजनी गटात आपल्या महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. खेलो इंडिया नंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.
काजोल सरगर ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे., तिचे वडील महादेव सरगर एक पानटपरी चालवतात तर आई छोटेसे हॉटेल चालवते. अत्यंत गरिबीतून कष्टातून काजोलने गेली तीन वर्षे वेटलिफ्टिंगसाठी तयारी सुरू केली होती. सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूटमध्ये काजोल आपले कोच मयूर सिंहासने यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे. मोठ्या जिद्दीने तिने प्रशिक्षण घेत हरियाणा येथे ५ जून रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने ४० किलो वजनी गटात सहभाग घेतला. या वजनी गटात एकूण १३ खेळाडू स्पर्धक सहभागी होते या सर्वांना मागे टाकत काजोलने तीन लिफ्ट क्लिअर करत सुवर्णपदक पटकावले. काजोलच्या कष्टामुळे आज महाराष्ट्राला वेट लिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळालं आहे. याबद्दल काजोलच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचा भाव आहे. यापुढे जाऊन काजोलला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून आपल्या देशासाठी सुवर्णपदक आणायची इच्छा असून ऑलम्पिकसाठी सुद्धा तिने तयारी सुरू केली आहे.
काजोलच्या या यशानंतर राज्याचे क्रीडामंत्री महादेव केदार यानीही तिचे अभिनंदन केले आहे तर सांगलीत काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनीही तिचे कौतुक केले. याचबरोबर आपल्या मुलीला मुलाचा दर्जा देऊन मुलाप्रमाणे वागवणाऱ्या काजोलच्या आईने आपल्या मुलीच्या यशाबद्दल तोंडभरून कौतुक करीत आनंद व्यक्त केले
जिद्द असेल तर परिस्थितीवर सुद्धा मात करता येते हे काजोलने दाखवून दिले आहे. आपले आईवडील काबाडकष्ट करतात आशा परिस्थितीत काजोलने मिळवलेले यश नक्कीच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे.