मुक्तपीठ टीम
दर वर्षी परदेशात पदव्युत्तर शिक्षणासाठी के. सी. महिंद्रा शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी ही शिष्यवृत्ती ६५ विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, पुण्यासह देशभरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण १८१२ अर्जदारांपैकी १०६ उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली होती. या मुलाखती ६ जुलै २०२१ रोजी पार पडल्या.
के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टची स्थापना १९५३ साली करण्यात आली. भारतात साक्षरता आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन दिले जावे हा यामागचा उद्देश आहे. आजवर तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त बुद्धिमान व गरजू विद्यार्थ्यांना १० लाख ३५ हजार डॉलर्सच्या शिष्यवृत्ती, उपजीविका प्रशिक्षण उपक्रम, शाळेचे वर्ग झाल्यानंतर ट्युशन स्वरूपात मदत आणि आर्थिक साहाय्य अशी मदत पुरवली गेली आहे.
के. सी. महिंद्रा शिष्यवृत्तीविषयी सर्व काही!
• परदेशात पदव्युत्तर अभ्यासासाठी के. सी. महिंद्रा शिष्यवृत्ती ही या ट्रस्टने सुरु केलेली पहिली शिष्यवृत्ती आहे.
• आजवर १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे लाभ प्रदान करण्यात आले आहेत.
• शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात या शिष्यवृत्ती १९५६ सालापासून देण्यात येत आहेत.
• अनेक केसीएमईटी शिष्यवृत्ती धारक क्रांतिकारी संशोधने करत आहेत, काहीजण विख्यात शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवत आहेत.
• इतकेच नव्हे तर, कितीतरी जण मोठमोठ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका, व्यापारी व आर्थिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या यांचे नेतृत्व करत आहेत.
• दर्जेदार आरोग्य व कायदा सेवा पुरवत आहेत, आयटी, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटिंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स यासारख्या नवनवीन क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.
देशभरातील विद्यार्थी
यंदाच्या वर्षी ही शिष्यवृत्ती ज्यांना देण्यात आली आहे ते ६५ विद्यार्थी भारतभरातील अहमदाबाद, अलप्पुझा, अनंतपूर, बेंगळुरू, भोपाळ, चंदिगढ, चेन्नई, दिल्ली धरमशाला, फरिदाबाद, गुरगाव, ग्वालियर, गुंटूर, हाथरस, हैदराबाद, मुंबई, इंदोर, जयपूर, मेदचल, नवी दिल्ली, पाटणा, पुणे, उडुपी, वडोदरा आणि वाराणसी या विविध शहरांमधील आहेत.
सर्व विद्यार्थी उच्च गुणवत्ताधारक
शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी २६ जण आयआयटींचे पदवीधारक आहेत तर बाकीच्यांनी बिट्स पिलानी, नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, लेडी श्री राम कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज, सेंट स्टीफन्स कॉलेज आणि सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या शिक्षण संस्थांमधून पदव्या घेतलेल्या आहेत. या उमेदवारांना परदेशातील सर्वाधिक रँकिंग असलेल्या विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेले आहेत, यामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया, लंडन बिझनेस स्कूल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज यांचा समावेश आहे.
किती असणार शिष्यवृत्ती?
पहिल्या तीन स्कॉलर्सना प्रत्येकी ८ लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती मिळतील तर इतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती दिल्या जातील. भारतातील सर्वात बुद्धिमान व सर्वोत्तम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेल्या एकूण शिष्यवृत्तींची यंदाच्या वर्षीची रक्कम २.७२ कोटी रुपये आहे. हे सर्व विद्यार्थी विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतील, यामध्ये कम्प्युटर सायन्स, अभियांत्रिकी, एमबीए, आर्किटेक्चर, डिझाईन, कायदा, सार्वजनिक धोरण, शिक्षण व अर्थशास्त्र यांचा समावेश असणार आहे.
शिष्यवृत्तीच्या निवड समिती
शिष्यवृत्तीच्या निवड समितीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे चेअरमन एमिरेट्स श्री. केशब महिंद्रा; महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, महिंद्रा इंटरट्रेड लिमिटेडचे अध्यक्ष भारत दोशी; ब्रिस्टलकोनचे चेअरमन उल्हास यारगोप; आयएसडीआय आणि आयएसएमईच्या प्रेसिडेंट व चेअर डॉ (श्रीमती) इंदू सहानी; ग्लोबल स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट कन्सल्टन्ट, चेंज मॅनेजमेंट एक्स्पर्ट आणि सीईओ रंजन पंत; मुरुगप्पा समूहाचे माजी चेअरमन एम एम मुरुगप्पन; नियानामधील भागीदार श्रीमती लीना लॅबरू; महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, एफएएएसच्या स्ट्रॅटेजी मार्किंग आणि ऑपरेटिंग एक्सेलन्स हेड श्रीमती ऐश्वर्या रामकृष्णन आणि महिंद्रा समूहाच्या चेअरमन यांच्या ईए श्रीमती श्रुती अगरवाल या मान्यवरांचा समावेश होता ज्यांनी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हे मुलाखतींचे सत्र दोन दिवस सुरु होते.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा काय म्हणतात?
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा सांगितले की, “जागतिक परिवर्तन घडवून आणणारे प्रमुख घटक एकविसाव्या शतकातील जगाला नवा आकार देत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे आणि आता महामारीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले आहेत. इतक्या प्रचंड उलथापालथीनंतर देखील केसीएमईटी आणि महिंद्रा पात्र विद्यार्थ्यांना जगद्विख्यात संस्थांमध्ये शिक्षणासाठी आर्थिक संधी प्रदान करत आहेत ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. जागतिक स्तरावरील करिअरमध्ये महत्त्वाकांक्षी भवितव्य घडवण्यासाठीच्या त्यांच्या वाटचालीत त्यांना मदत करणे हे आमचे लक्ष्य आहे.”
विद्यार्थ्यांना काय वाटते?
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्यांपैकी मैत्रेय शाह या वडोदरा येथील विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया येथे प्रवेश मिळाला आहे. त्याने सांगितले, “केसी महिंद्रा शिष्यवृत्तीसाठी सर्वात पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये माझी निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांची समृद्ध परंपरा असलेल्या बुद्धिवंतांच्या समुदायामध्ये माझा समावेश झाला आहे ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे. निवड प्रक्रिया काटेकोर होती आणि तितकीच उत्साहवर्धक देखील होती, यामुळे मला देशातील काही सर्वोत्तम बुद्धिमान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची मौल्यवान संधी मिळाली. निवड समिती व ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या मृदू सौजन्यामुळे आमच्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया आम्हाला अतिशय सुरळीतपणे पार करता आली. ट्रस्टकडून दिली जाणारी मदत मला माझ्या सर्व क्षमतांनिशी वापरता येईल, अभ्यासातील माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येईल आणि अपंगत्व, कायदा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमधील माझे काम अधिक पुढे नेता येईल. केसी महिंद्रा स्कॉलर म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे.”
हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन येथे उच्च शिक्षणासाठी जाणार असलेल्या जिज्ञासा लॅबरू या धरमशाला येथील विद्यार्थिनीने सांगितले, “२०२१ या वर्षासाठी केसी महिंद्रा फेलो म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी आभारी आहे, माझ्यासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. भारतातील समस्या सोडवण्यासाठी युवा पिढीला जागतिक दर्जाची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे या माझ्या विचाराला शिष्यवृत्तीमुळे बळकटी मिळाली आहे. हा विचार प्रत्यक्षात साकार करण्याच्या माझ्या वाटचालीत ही शिष्यवृत्ती मदत करेल. हार्वर्डला मी फक्त एक पदवी मिळवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी अशा संधी निर्माण करण्यासाठी जाते आहे ज्यामुळे मला लहान मुलांसाठी सुरक्षित विश्व निर्माण करण्याच्या माझ्या कामाला वेग देता येईल आणि मदत मिळवता येईल. अवघे जीवन बदलवून टाकण्याची क्षमता असलेली संधी फक्त आर्थिक कारणांमुळे गमवावी लागू नये यासाठी ही शिष्यवृत्ती मला खूप मोलाची ठरेल.”
के सी महिंद्रा शिष्यवृत्तींबद्दल अधिक माहितीसाठी कृपया इथे संपर्क साधावा: www.kcmet.org
के सी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट (केसीएमईटी)
भारतामध्ये साक्षरता आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दिवंगत के सी महिंद्रा यांनी १९५३ साली के सी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्यांना आर्थिक साहाय्य आणि ओळख मिळवून देऊन, सर्व वयोगट आणि उत्पन्न गटातील व्यक्तींना मदत उपलब्ध करवून देऊन केसीएमईटीने अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. आजवर तब्बल ५,००,००० पेक्षा जास्त बुद्धिमान व गरजू विद्यार्थ्यांना १०,३५,००० डॉलर्सच्या शिष्यवृत्ती, उपजीविका प्रशिक्षण उपक्रम, शाळेचे वर्ग झाल्यानंतर ट्युशन स्वरूपात मदत आणि आर्थिक साहाय्य अशी मदत पुरवली गेली आहे.
महिंद्रा
महिंद्रा समूहाची स्थापना १९४५ साली करण्यात आली. देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक सन्माननीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समूहांपैकी एक म्हणून महिंद्रा समूह गणला जातो. महिंद्रामध्ये जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये २,६०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. भारतात शेतीसाठीची उपकरणे, सुविधा वाहने, माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा क्षेत्रात हा समूह नेतृत्वस्थानी असून व्हॉल्युमच्या दृष्टीने ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. शुद्ध ऊर्जा, शेती, लॉजिस्टिक्स, आतिथ्य आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात हा समूह आघाडीवर आहे.
जगभरात ईएसजीचे नेतृत्व करण्यावर, ग्रामीण भागांमध्ये समृद्धी आणण्यावर आणि शहरी जीवनात सुधारणा घडवून आणण्यावर महिंद्रा समूहाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. समुदाय व हितधारकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाला वेग देऊन त्यांना पुढे जाण्यासाठी सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश आहे.
पाहा व्हिडीओ: