मुक्तपीठ टीम
कोल्हापूरच्या राधानगरी, दाजीपूर अभायरण्याचं आकर्षण निसर्ग प्रेमींना खूपच. आता जंगल सफारीसाठी वन्यप्राण्यांच्या चित्रांनी सजविलेल्या बसचे उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘वन विश्राम गृह’ येथे केले. पहिल्या बसमधून बालकल्याण संकुल येथील पंधरा अनाथ मुलांना मोफत जंगल सफारीसाठी नेण्यात आले.
राधानगरीच्या या ‘जंगल सफारी बस’ मुळे देश विदेशातून राधानगरी परिसराच्या पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची सोय होणाराय. त्यांना अभयारण्यातील जैवविविधता व पशुपक्षी पाहण्याची संधी मिळेल. जंगलामध्ये पर्यटनाच्या हेतूने नवीन ट्रेकरुट व सायकल रुट सुरु करावेत, अशा सूचनाही सतेज पाटील यांनी केली. यावेळी खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, सह्याद्री व्याघ्र राखीव विभागाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, तसेच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजना आराखड्यात तरतूद करून कोल्हापूर वन्यजीव विभागास १५+२ सीटर बस घेण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून सहा दिवस बुधवार ते सोमवारी (मंगळवारी सुट्टी) दररोज सकाळी ७ वाजता वन विश्रामगृह, ताराबाई पार्क, नाना नानी पार्क समोर, कोल्हापूर येथून राधानगरी, दाजीपूर पर्यटनासाठी निघेल. एका पर्यटकाला नाममात्र ३०० रुपये फी मध्ये एकवेळ चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, राऊतवाडी धबधबा, माळेवाडी डॅम बोटिंग व दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र व गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना देखील मोफत जंगल सफारी करता येणार आहे.
या बसच्या बुकिंगसाठी विभागीय वन अधिकारी(वन्यजीव) यांचे कार्यालय, सिमंतिनी अपार्टमेंट, रमणमळा, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक-0231- 2669730 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन विशाल माळी यांनी केले.