मुक्तपीठ टीम
भाऊबीज म्हटलं की बहिणींचे चेहरे फुलून येतात ते भावाशी असलेल्या आपुलकीच्या नात्यातील एक दिवस असल्यामुळे. रक्षाबंधनानंतर दोघांनाही आतुरता असते ती या दिवसाचीच. दिवाळीतील आतिषबाजी, रोषणाई, आवडतं गोड-धोड या साऱ्याएवढंच किंवा जास्तच महत्व असतं ते नात्यांचा गोडवा अधिकच वाढवणाऱ्या भाऊबीजेला. नात्यातील आपुलकीचा हा गोडवा सामाजिक स्तरावर वाढवण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक सस्थेनं एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम आहे, कृतज्ञतेच्या भाऊबीजेचा. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून गेली दोन वर्षे कोरोना संकटात स्वत:चे जीव धोक्यात घालून समाजासाठी लढलेल्या आरोग्य, पोलीस क्षेत्रातील भगिनींना भाऊबीजेची कृतज्ञता भेट म्हणून पैठणी भेट दिली जाते.
मागील दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आशाताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनींसाठी आजची भाऊबीज आनंदाची ठरली. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून या सर्व भगिनींना पैठणीची भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचं महाभयंकर संकट पसरलं, तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कुटूंबाची काळजी न करता कोरोनाच्या संकटाचा सामना करत लढत राहिल्या, त्या आपल्या आशा ताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनीचं. त्यामुळेच मागील वर्षीप्रमाणेचं यावर्षीही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पैठणी भेटीच्यारुपाने “जिजाऊची भाऊबीज कृतज्ञतेची ” १० हजार भगिनींपर्यंत पोहचवत साजरी केली.
आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत, त्या समाजाचे काहीतरी देणकरी लागतो, सर्व समाजाचे आपल्यावर असंख्य ऋण असतात ते ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून स्वकमाईतून समाजाची सेवा करण्याचं ध्येय निलेश सांबरे यांचे आहे. आरोग्य, शिक्षण, कला-क्रीडा, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ संस्था अग्रक्रमाने विविध उपक्रम राबवत आहे. समाजाचा विकास करणे हेच एकमेव ध्येय समोर राखत मानवतेच्या कल्याणासाठी जिजाऊ संस्था आपलं कर्तव्य पार पाडत आहे.
जिजाऊची भाऊबीज कृतज्ञतेची, भगिनींना आपुलकीच्या पैठणी भेटीची! – निलेश सांबरे
- संकट आलं की सर्वच आठवण ठेवतात. संकट सरलं की खूप कमी आठवण ठेवतात. आपली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था एका वेगळ्या सामाजिक जाणीवेतून प्रत्येक संकटात समाजासोबत असते. त्याच जाणीवेतून संकटात कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या आरोग्य सेविका, आशा वर्कर, डॉक्टर, नर्स, महिला पोलीस, महिला स्वच्छता कामगार या सर्व भगिनींसाठी आपल्या जिजाऊचे सर्व भाऊ पुढे सरसावत असतात.
- आपुलकीच्या याच जाणीवेतून दर वर्षी या भगिनींना कृतज्ञतेची भाऊबीज साजरी करण्याची प्रेरणा मला आई-वडिलांच्या संस्कारातून मिळाली. त्या भावनेतूनच या प्रत्येक भगिनीला कृतज्ञतेची भाऊबीज म्हणून त्यांच्या जिव्हाळ्याची पैठणी दिली जाते.
- पैठणीची आपुलकीची भेट स्वीकारताना आपल्या भगिनींच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद सर्वांचाच हुरुप वाढवतो. तसंच पुढील वर्षभरात समाजासाठी कर्तव्य बजावण्याचं सामर्थ्य देतो! हे बळ कायम मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या जीवाची तमा न करता समाजाची आरोग्य रक्षणासाठी सेवा करणाऱ्या आशा ताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनींना स्नेहाची जिजाऊची पैठणी भेट देण्यासाठी जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक, पदाधिकारी व जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यानी, विशेष मेहनत घेतली.
पाहा व्हिडीओ: