मुक्तपीठ टीम
भाऊबीज म्हटलं की बहिणींचे चेहरे फुलून येतात ते भावाशी असलेल्या आपुलकीच्या नात्यातील एक दिवस असल्यामुळे. रक्षाबंधनानंतर दोघांनाही आतुरता असते ती या दिवसाचीच. नात्यातील आपुलकीचा हा गोडवा सामाजिक स्तरावर वाढवण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक सस्थेनं एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम आहे, कृतज्ञतेच्या भाऊबीजेचा.
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून गेली दोन वर्षे कोरोना काळात समाजासाठी लढलेल्या अंगणवाडी सेविका, आशाताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस क्षेत्रातील भगिनींना भाऊबीजेची कृतज्ञता भेट म्हणून पैठणी भेट दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालघरमधील मुरबाड, सफाळे, बोईसर, मनोर या विभागात मिळून एकून १ हजार भगिनींना पैठणी भेट दिली आहे. २४ ऑक्टोबर २०२२ रोजी कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ या तिन्ही तालुक्यातील एकूण १५०० भगिनींना पैठणी व भेटवस्तू देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आशाताई उपस्थित होत्या. २५ ऑक्टोबर रोजी मुरबाड तालुक्यातील म्हासा, सरळगाव आणि धसई येथील एकूण २३० आशा सेविकाताई यांच्या उपस्थितीत ही कृतज्ञतेची भाऊबीज साजरी करण्यात आली.
मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचं महाभयंकर संकट पसरलं, तेव्हा पासून आजपर्यंत आपल्या कुटूंबाची काळजी न करता कोरोनाच्या संकटाचा सामना करत लढत राहिल्या त्या आपल्या आशा ताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनीचं. त्यामुळेच मागील वर्षीप्रमाणेचं यावर्षीही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिजाऊ कृतज्ञतेची भाऊबीज साजरी केली आहे. कल्याण तालुक्यातील आचार्य अत्रे रंगायतन, उल्हासनगर चार मधील शासकीय प्रसुती गृह, बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंबरनाथ पीएचसी केंद्र येथील डॉक्टर्स नर्स, आशाताई अशा एकूण १५०० भगिनींना पैठणी साडी देऊन कृतज्ञतेची भावी साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे, जिजाऊ संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आशा सेविका ताई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाचे काहीतरी देणकरी लागतो, सर्व समाजाचे आपल्यावर असंख्य ऋण असतात ते ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून स्वकमाईतून समाजाची सेवा करण्याचं ध्येय निलेश सांबरे यांच असून आरोग्य, शिक्षण, कला-क्रीडा, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ संस्था अग्रक्रमाने विविध उपक्रम राबवत असून समाजाचा विकास करणे हेच एकमवे ध्येय असून मानवतेच्या कल्याणासाठी जिजाऊ संस्था कार्य करून आपलं कर्तव्य पार पाडत आहे.
आपुलकीच्या याच जाणीवेतून दर वर्षी या भगिनींना कृतज्ञतेची भाऊबीज साजरी करण्याची प्रेरणा मला आई-वडिलांच्या संस्कारातून मिळाली. त्या भावनेतूनच या प्रत्येक भगिनीला कृतज्ञतेची भाऊबीज म्हणून त्यांच्या जिव्हाळ्याची पैठणी दिली जाते. पैठणीची आपुलकीची भेट स्वीकारताना आपल्या भगिनींच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद सर्वांचाच हुरुप वाढवतो. तसंच पुढील वर्षभरात समाजासाठी कर्तव्य बजावण्याचं सामर्थ्य देतो! हे बळ कायम मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे निलेश सांबरे म्हणाले.