मुक्तपीठ टीम
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण ठाणे जिल्हा प्रमुख मोनिका ताई पानवे या पाणी टंचाई, खंडित विजपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य अव्यवस्था आणि बेरोजगारी या समस्यांच्या निवारणासाठी शहापूर तहसिल कार्यालय समोर सोमवार २१ मार्चपासून उपोषण करणार आहेत. ‘पाणी-वीज-रस्ते-आरोग्य-रोजगार’ हे कोणत्याही नागरिकांसाठी महत्वाच्या पाच हक्काच्या सुविधा आहेत, मात्र महामुंबईच्या या सुविधांची गरज भागवण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या शहापूरकरांचेच हे हक्क डावलले जात आहेत. त्यामुळे या पाच हक्कांसाठी आपण उपोषण करणार असल्याचं मोनिकाताई पानवेंनी जाहीर केलं आहे.
जिजाऊ संस्था गेली १४ वर्षापासून ठाणे-पालघर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम, सामाजिक कार्य व जनसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भेडसावणारी पाणी टंचाई, खंडित विजपुरवठा, रस्त्याची दुरावस्था, असलेली आरोग्य अव्यवस्था आणि बेरोजगारी या समस्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास या समस्या मुक्ततेसाठी जिजाऊने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहापूर तालुक्यातील ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण होत आहे. यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विजपुरवठा करणाऱ्या विजेचे खांब, विद्युत तारांची अवस्था खराब असल्याने पावसाळ्यात सातत्याने विज पुरवठा खंडित होत आहे. तसेच तालुक्यातील गावांना जोडले गेलेले अनेक रस्ते यांची दुरावस्था झालेली आहे. महिलांसाठी आरोग्याची व्यवस्थित सोय नसल्यामुळे वेळेत उपचार मिळणे अवघड जाते. तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे.
त्यामुळे तालुक्यातील या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर कृती योजना मांडून यासाठी प्रयत्न व्हावेत यासाठी तहसिल कार्यालय समोर उपोषण करण्यात येत असल्याचे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या महिला सक्षमीकरण ठाणे जिल्हा प्रमुख मोनिका ताई पानवे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.