मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना अतिवृष्टीनं झोडलं. एकीकडे होत्याचं नव्हतं करणारा महापूर तर दुसरीकडे माणुसकीच्याही लाटा उसळल्या. ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसणाऱ्यांच्या मदतीसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली.
मुसळधार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे ठाण्याच्या ग्रामीण भागात मोठा फटका बसला. रेल्वे बंद पडल्याने शेकडो प्रवाशी अडकल्याने त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. त्यामध्ये छोटी मुले, महिला माता-भगिनी मोठ्या प्रमाणावर होते. त्यांची खूप गैरसोय होत असल्याने जिजाऊचे कसारा विभागाचे सदस्य सुभाष करवर यांना समजताच सुभाष यांनी तात्काळ जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना कळवले. सांबरे यांनी तात्काळ अडकलेल्या प्रवाशांसाठी नाश्ता, पाणी, बिस्किटांसह कार्यकर्त्यांना कसारा स्टेशनवर पाठवून दिले.
यावेळीं जिजाऊ संघटना कसारा विभागाचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, नवनाथ आडोळे, जनार्दन भेरे, भास्कर सदगीर निवृत्ती मांगे, कमलेश सावंत, लक्ष्मण दुभाषे, सचिन बांबळे, जयेश भगत, पत्रकार बंधू सचिन राऊत(पुण्य नगरी), शहाबाज दिवकर व जिजाऊचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडीत पूरग्रस्तांसाठी ‘जिजाऊ’कडून जेवणाची व्यवस्था
भिवंडी शहरात १२ जुलैला अतिवृष्टीमुळे विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली. राहत्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक भागांमध्ये घरांमध्ये पाणी भरून राहिल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. काही ठिकाणी तर जेवणाची मोठी समस्या निर्माण झाली होती. जिजाऊ संस्थेचे भिवंडी समन्वयक पंकज पवार व फराज इस्माईल यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्याबद्दल ‘जिजाऊ’चे संस्थापक निलेश सांबरे यांना माहिती दिली जाताच त्यांनी तात्काळ जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानुसार भिवंडी शहरातील ईदगाह, तकिया अमानी शाह, स्लॉटर भागातील ६५०हून पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच पुढील काही दिवस काहींसाठी ‘जिजाऊ’कडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी भिवंडी शहरातील अझहर खान, नदीम अंसारी, दाऊद शेख कल्पेश नाईक, इमरान अंसारी, उझैर शेख स्वप्निल जोशी. आदी स्वयंसेवकानी विशेष मेहनत घेतली.
प्रत्येक जिल्ह्यासाठी ‘जिजाऊ’ची एक टीम!
जिजाऊ संस्था निलेश सांबरेंच्या माध्यमातून संपूर्ण कोकणामध्ये आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण, क्रीडा इत्यादी विविध विषयावर कार्यरत आहे. जिजाऊ संस्थेने मागील वर्षी सांगली कोल्हापूर येथे पूर परिस्थितीत सुद्धा काम केलं होत. मागील आठवड्यात आलेल्या महाप्रलयकारी पुरामुळे भिवंडीतील ईदगा रोड, सलाटर हाऊस येथे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. ह्या पूर परिस्थितीची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून जिजाऊ संस्थेला मिळताच येथील हजारो पूरग्रस्तांना भर पावसात जेवणाची व्यवस्था करण्यात आली. पुराचे पाणी कमी होताच स्थानिक कार्यकर्ते व स्थानिक स्वयंसेवक ह्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून आरोग्य समस्या जाणून घेऊन आरोग्य शिबीराच आयोजन करण्यात आलं. तसेच काही घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यांना आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली आहे. सर्व पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूच वाटप कार्यक्रम सुरू आहे.
“जोपर्यंत विस्कळीत झालेलं जनजीवन सुरळीत होत नाही तोपर्यंत जिजाऊ संस्थेचं हे मदतकार्य सुरू राहणार आहे. एक टीम रायगड, एक टीम कोकणामध्ये व ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्व पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूसह सर्व टीम दाखल होऊन मदतकार्य सुरू आहे. सर्व मदतकार्य जनजीवन सुरळीत होईपर्यंत सुरू राहणार आहे.” असे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी जाहीर केले आहे.