मुक्तपीठ टीम
नाव जिजाऊंचं, कार्य महिला सक्षमीकरणाचं! कोकणपट्ट्यात जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था समाजकार्यासाठी ओळखली जाते. आता जिजाऊने महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण सुरु केलं आहे. जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या १७ एप्रिलच्या वाढदिवसानिमित्त सध्या सेवाभावी उपक्रमांनी भरगच्च भरलेला सेवा महिना साजरा केला जातोय. त्यात आतापर्यंत ३५ महिलांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. आणखी अडीचशे महिलांचं प्रशिक्षण सुरु आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतूने महिलांसाठी ऑटो रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण सुरु करण्यात आलं आहे. हे ऑटो रिक्षा प्रशिक्षण ठाण्यातील पवार नगर, रौनक पार्क येथे सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २६५ महिलांनी ऑटो रिक्षा प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्यातील ३५ महिलांचे ऑटो रिक्षा प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. २१ महिलांना वाहन परवाना काढण्याची प्रक्रिया संस्थेतर्फे सुरू आहे.
सर्वात खास भाग असा की प्रशिक्षण देणाऱ्यांमध्ये मनिषा भंडारी या महिला प्रशिक्षिकाही आहेत. त्यांच्यासह अमित महाडिक हेही ऑटो रिक्षा प्रशिक्षण देत आहेत.
ठाण्यातील जिजामाता येथे राहणाऱ्या सौ.अक्षता घाणेकर यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रिक्षा चालवण्याचे मोफत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढला असून त्यांच्या कुटूंबास देखील हातभार लागणार आहे. स्वावलंबी, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वत:च्या पायावर उभी राहिलेली स्त्री ही खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासातील योगदानाची साक्ष ठरते. त्यामुळे अक्षता यांची “आज नाही तर कधीच नाही, गेलेला आत्मविश्वास जिजाऊ संस्थेमुळे मिळाला परत!” ही प्रतिक्रिया जिजाऊच्या रिक्षा प्रशिक्षण उपक्रमांची सार्थकता दाखवून देते.