मुक्तपीठ टीम
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात कोरोनाशी मुकाबला करण्यामध्ये अग्रभागी राहून कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शहीद दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकारने उचलावी अशी विनंती केली आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे समाजकार्यात अतिशय भरीव कामगिरी करत आहे. अलीकडेच कोरोनामुळे पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या पाच जिल्ह्यांतील बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाऊ संस्था उचलेल अशा आशयाचे निवेदन माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, पालघर निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. आता, पंतप्रधानांना लिहलेल्या निवेदनात सांबरे यांनी संपूर्ण देशाला कोरोनामुक्त करण्यात अग्रेसर असणाऱ्या आरोग्यसेवकांबद्दल कळकळ व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आणि आता दुसऱ्या लाटेत आरोग्यसेवक आपला जीव घोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत. घरदार विसरून काम करणाऱ्या हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा प्रकारे कोरोनाशी लढताना व आपले कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आल्याने त्यांना शहीद दर्जा मिळावा अशी विनंती सांबरे यांनी या निवेदनात केली. या आरोग्य कर्मचाऱ्यांवर त्यांच्या कुटुंबीयांची देखील जबाबदारी होती, अनेक परिवारांनी त्यांचा एकुलता एक आधार गमावल्याने त्यांची जबाबदारी सरकारने स्वीकारावी व संबंध भारत परिवाराचा प्रमुख या नात्याने शहीद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सरकारी सेवांमध्ये रुजू करण्याचा सन्मा. प्रधानमंत्र्यांनी विचार करावा. याशिवाय, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची तजवीजही सरकारने करावी अशी सांबरे यांनी विनंती केली.
कोरोनामुळे हवालदिल झालेल्या गरजूंपासून ते तौक्ते वादळाच्या तडाख्यात मोठे नुकसान झालेल्या गरिबांपर्यंत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था जनतेला वेळोवेळी दिलासा देत आहे.