मुक्तपीठ टीम
शोपियातील जैनापोरा भागातील चेरबर्ग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील वीर जवान रोमित तानाजी चव्हाण (वय २४) हे आपल्या एका सहकार्यासह शहीद झाले होते. आज वारणा नदीकाठी रोमित यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित राहत शहीद रोमित चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जयंत पाटील यांनी अवघ्या २४व्या वर्षी जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना रोमित यांना हौतात्म्य आले. रोमित यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली हे वाळवा तालुका कधीच विसरणार नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी भारतीय सैन्यात सामील व्हायचे हे रोमित यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी पूर्ण केले. तसेच सैन्यात काम करताना एक धाडसी आणि कर्तव्यदक्ष जवान असा नावलौकिकही मिळवला. आपल्या देशाबद्दल असीम श्रद्धा असलेल्या रोमित यांना अतिशय कमी वयात आपले प्राण गमवावे लागले, याचं दुःख वाटते असेही जयंत पाटील म्हणाले.