मुक्तपीठ टीम
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनिर्बंध उद्रेक झाला असल्यामुळे राज्यात सरकारने कठोर निर्बंध आणि दोन दिवसांचा लॉकडाऊनही जाहीर केला आहे. मात्र, हे सारे कठोर निर्बंध फक्त सामान्यांसाठी आहेत का? असा प्रश्न राजकीय नेत्यांचे बेबंद वागणे पाहून उपस्थित होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत मास्क काढून भाषण केले. तेही खूप कमी प्रमाणात मास्क घातलेल्या लोकांच्या गर्दीत! त्याहीपुढे जात त्यांनी भाषणात मास्क काढण्याचं समर्थन केले. केवळ जयंत पाटीलच नव्हे तर शिवसेनेसारख्या कठोर निर्बंध समर्थक सत्ताधारी पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारीही कोरोना नियमांचा सर्रास भंग करताना दिसत आहेत.
पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राजंनी येथे आले होते. या सभेला जयंत पाटलांनी संबोधित केलं. “तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो”, असं म्हणत पाटील यांनी चक्क मास्क काढून भाषणाला सुरुवात केली.
या मतदारसंघातील आमदार भारत भालके यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला. भालके यांच्या निधनाने पोट निवडणूक लागली आहे. याच मतदारसंघातील आणखी एक राजकीय नेते माजी आमदार सुधाकर परिचारक यांचाही कोरोनामुळेच मृत्यू ओढवला होता. त्यामुळे या मतदारसंघासाठी राजकीयदृष्ट्याही कोरोना हा संवेदनशील विषय आहे.
या सभेत जागेच्या मानाने प्रचंड गर्दी करण्यात आली होती. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची सॅनिटायझरची सोय नव्हती, अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दीपक साळुखे, भगिरथ भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंतरावांचे ‘उपरोधिक’ लंगडे समर्थन!
भाषणानंतर पत्रकारांनी विचारले असता, आपण ते उपरोधाने बोललो. भाषण करताना मास्क काढावाच लागतो. भाषणात आपण कोरोनाची गंभीरता लक्षात आणून दिली, असेही त्यांनी सांगून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे समर्थन करताना त्यांना अगदी खेटून गर्दी केलेल्या एकाही कार्यकर्त्याने मास्क घातला नव्हता, त्यामुळे ते समर्थन लंगडेच ठरले, असे मानले जाते.
शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाच्या गर्दीत कोरोना नियम पायदळी!
जयंत पाटील हे किमान उपरोधाने बोललो असे बोलून समर्थन करु शकले. पण महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधी युद्धात कठोर भूमिका घेऊन उभे ठाकणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचेच नेते त्यांच्या आवाहनाला जुमानत नाहीत, असे दिसते.
कल्याणच्या चिकणघर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात खूप मोठी गर्दी उसळली होती. कोरोना नियमांचे पालन केले गेले नव्हते. मास्कचा पत्ता नव्हता. लग्न समारंभासाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेचंही उल्लंघन करण्यात आले.
डोंबिवलीमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसेच्या काही मोजक्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता मनसेला तयार मुद्दा मिळाला आहे.