मुक्तपीठ टीम
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाखाली आदरणीय पवारसाहेबांनी हे कुटुंब तयार केले आहे. भावनांच्या धाग्याने हा परिवार त्यांनी गुंफला आहे.शरदचंद्र पवार या चंद्राच्या चांदण्याने कित्येक आयुष्य प्रकाशमान करून टाकले आहे,” अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले.
अनेक जण म्हणतात पवारसाहेबांचं राजकारण हे unpredictable आहे, त्यांचा काही नेम नाही… पण त्यांचा नेम इतका अचूक असतो की त्यांनी घेतलेल्या निर्णयाने एक सामाजिक परिवर्तन घडतं उदाहरणार्थ मराठवाडा विद्यापीठ नामांतर, महिला आरक्षण, महाविकास आघाडी असेही जयंत पाटील म्हणाले.
पवारसाहेबांचं आयुष्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे, जेव्हा आपल्याला वाटतं की मार्ग सापडत नाही, अडचणींचा विळख्यात आपण सापडलोय… तेव्हा पवारसाहेबांचं चित्र डोळ्यासमोर आणलं की आपल्याला नक्कीच लढण्याची जिद्द मिळते असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
आज राज्यातील जनता आणि कार्यकर्ते व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पहात आहेत. माणसं कशी जोडायची याचा आदर्श पवारसाहेबांनी घालून दिला आहे. पवारसाहेबांच्या विचारांची शिदोरी आमच्याकडे आहेत. विचारांचं धन वाढवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात पहिल्या शनिवारी एकत्र बसून चर्चाविनिमय करावा त्यासाठी तिथे असणाऱ्या सेवादलाच्या कार्यकर्त्याला सोबत घ्यावे. एक जानेवारीपासून जनता दरबार भरवला जाणार असल्याचे सांगतानाच तसेच संपर्क मंत्र्यांनी जिल्हयात जनता दरबार घेण्याची सूचना जयंत पाटील यांनी केली.
यापुढे जो क्रियाशील कार्यकर्ता असेल त्यालाच पक्षाचे तिकिट देणार आहे. विशेषतः ज्याने पक्षासाठी खास्ता खाल्ल्या आहेत अशा आणि जास्तीत जास्त युवक व महिलांचा यामध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाबाबत कोर्टाने स्थगिती दिली आहे. जाणीवपूर्वक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. जोपर्यंत ओबीसींना घेऊन निवडणूका होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका अशी भूमिका पक्षाची असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सत्तारूढ आणि हे पाहुणे (ईडी) एकत्र आहेत का अशा पध्दतीने केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. ईडी म्हणजे काय हे पारावर बसलेल्या लोकांनाही आता कळू लागले आहे असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
महाराष्ट्रात सूडाचे राजकारण कधी झाले नाही. विरोधकांना सन्मानाने वागवायचे हा विचार यशवंतराव चव्हाण यांनी दिला आहे. परंतु सध्या ही परिस्थिती वेगळी असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
भाजपाला शेतकऱ्यांसमोर, त्यांच्या लढयासमोर नतमस्तक व्हावं लागलं इतकं मोठा लढा शेतकऱ्यांनी दिला आहे. भारतातील शेतकरी यावेळी जिंकला आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग योजना राज्यात आजपासून सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान ज्याचं बोट धरून राजकारण शिकले त्या नेत्याच्या छत्रछायेखाली काम करण्याची संधी मिळाली आहे असेही जयंत पाटील म्हणाले. एनसीपी अॅपच्या माध्यमातून ताज्या घडामोडी व माहिती आणि पक्षाच्या कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे.
शेवटी पवारसाहेबांच्या कारकीर्दीला शोभेल अशी सुरेश भट यांची कविता जयंत पाटील यांनी सादर केली.
माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे…
जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…!!
रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर…
डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही…!!
येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो…
अडथळ्यांना भिवून अडखळणे, या पावलांना पसंत नाही…!!