मुक्तपीठ टीम
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता त्याचप्रमाणे आजही देश लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी एकवटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.
याच ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी ‘भारत छोडो’चा नारा दिला होता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून ब्रिटिशांना परतवून लावले होते. आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पेगॅसससारख्या गोष्टी आणत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.