मुक्तपीठ टीम
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी बिल मागे घेण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल असे भाकीत प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या संकल्पनेतून आज साखराळे गावी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम घोषित केला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा संवाद उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
आज साखराळे गावातील बैठकीत कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या त्याची दखल घेत त्यावर उपाययोजना करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
बारावीची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाईन या मुद्द्यावरून विरोधकांनी मुलांची मने कलुषित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना लीडर बनवत महाविकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने केली जात आहेत. मात्र मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जाणून-बुजून रासायनिक खतांच्या किंमती वाढवत शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. उत्तरप्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या. देशभर शेतकरी विरोधी भूमिका आपण सातत्याने अनुभवल्या आहेत याची आठवणही जयंत पाटील यांनी यावेळी करुन दिली.