मुक्तपीठ टीम
मी कधी काम सांगितले आणि ते काम एकनाथ शिंदे यांनी कधी नाकारलं आहे असं झालं नाही त्यामुळे ‘थेट नगराध्यक्ष’ निवडीच्या या विधेयकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेरविचार करतील असा विश्वास व्यक्त करतानाच या विधेयकाला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोध केला.
या विधेयकामुळे नगरपालिकेच्या कामकाजात मोठा गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच नगरपालिका अशा आहेत ज्या ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचे आणि सदस्यांची बहुसंख्या विरोधी पक्षाची. यामुळे अनेक निर्णय होत नाही, प्रयत्न करून घेतला तरी त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही आणि नगरपालिकेचे कामकाज ठप्प होते त्यामुळे अपप्रवृत्ती वाढीस लागेल असेही जयंत पाटील म्हणाले.
थेट नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग याआधीही राज्यात केला गेला होता मात्र त्याचे अत्यंत वाईट अनुभव राज्यातील विविध भागात आले. त्यामुळे मागच्या सरकारचे नगरविकास मंत्री यांनी तो निर्णय चुकीचा ठरवला असेही जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की त्यांनी या विधेयकावर पुन्हा एकदा विचार करावा. या विधेयकाला स्थगिती द्या. आपल्याला समर्थन असणाऱ्या सदस्यांना खाजगीत विचारले तर त्यांचाही या विधेयकाला विरोध असेल. या विधेयकामुळे नगरपालिकेची गती खुंटते, विरोधाभासामुळे निधी परत जातो असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.