जयंत माईणकर
भाजपाचे अतिउत्साही अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पुढील काळात केवळ भाजपा हाच राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्वात राहील आणि प्रादेशिक पक्ष तर सोडाच पण काँग्रेसमध्येही भाजपाला विरोध करण्याची ताकद नसेल अस म्हणणं ही जशी ‘ दर्पोक्ती ‘ आहे तशीच संघ शताब्दीच्या वर्षी म्हणजेच २०२५ सालच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदीच भाषण करतील याची पूर्वतयारी आहे, अस वाटत.
संघ परिवार फार दूरच ‘ प्लॅनिंग ‘ आधीपासून करत असतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उशीर लागला किंवा सत्ता गमवावी लागली तरीही त्यांची तयारी एकेकाळी असायची. पण संघाच्या या पद्धतीत बदल होऊ लागला बाबरी मस्जिद पाडल्यानंतर! देशाच्या राजकारणातील किमान नंबर दोनची जागा आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हा कॉन्फिडन्स सुमारे दहा हजार लोकांचा बळी घेणाऱ्या या घटनेने भाजपाला दिला होता. तर गोध्रा दंगलीने मिळवलेली सत्ता राखण्यासाठी एक हत्यार भाजपला मिळवून दिलं नरेंद्र मोदींच्या रूपाने! स्व केशुभाई पटेल मुख्यमंत्री असतानाचा त्यांचा काळ मी जवळून पाहिला आहे. प्रशासनावरची आणि मंत्र्यांवरची त्यांची पकड हळूहळू कमी होत होती. केशुभाईंच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही असा संघाच्या ‘ थिंकर्स ‘ चा रिपोर्ट वाजपेयी – अडवाणी यांच्याकडे गेला आणि नरेंद्र मोदींचं राज्यात आगमन झालं. गोध्रा दंगलीनी मोदींना ‘ हिंदू मसिहा ‘ ही इमेज मिळवून दिली ज्याच्या भरवशावर त्यांनी पुढे लागोपाठ तीन निवडणुका गुजरात मध्ये आणि दोन निवडणुका देशात जिंकल्या. आता त्यांना गुजरातप्रमाणेच देशातही ‘ हॅटट्रिक ‘ करायची आहे . ही हॅटट्रिक यासाठी महत्त्वाची कारण त्यांच्या मातृ संघटनेला २०२५ ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा भाजपाला त्यांना सर्वात जास्त विजय मिळवून देणारा स्वयंसेवक पंतप्रधान म्हणून हवा आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात लागोपाठ तीन वेळा केंद्रात सत्तेवर येण्याचा विक्रम केवळ पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावावर आहे. १९५२,५७ आणि ६२ च्या निवडणुका त्यांनी लागोपाठ जिंकल्या होत्या. आता संघ परिवाराला आपल्या स्वयंसेवकाच्या हातून नेहरूंच्या त्या विक्रमाची बरोबरी करायची आहे. नेहरू – गांधी परीवाराच्या नावाने असलेले सगळे विक्रम मोडण्याचा हा संघ परिवाराचा प्रयत्न आहे. याआधीच प्रथम एक दलीत आणि नंतर आदिवासी राष्ट्रपती देऊन संघ परिवाराने आपण सर्व हिंदू समावेशक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र ती आपुलकी ते अद्याप मुस्लिम धर्माबद्दल दाखवू शकले नाहीत.
संघ परिवाराच्या अंतःस्थ सूत्रानुसार मोदी २०२७ पर्यंत आपल्याकडे पंतप्रधानपद ठेऊन नंतर ७५ वर्षांवरील राजकारण्यांनी निवृत्त व्हावं या भाजपने तयार केलेल्या अलिखित नियमाच पालन करत पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती बनतील. किंवा २०२९ पर्यंत पंतप्रधानपदी कायम राहतील.
संघाने असाच प्लॅन २००२ साली वाजपेयी आणि अडवाणी या जोडीकरता बनवला होता. पण वाजपेयींनी पंतप्रधानपद सोडण्यास नकार दिल्याने आणि अडवाणींनी वेळेवर कच खाल्ल्याने हे घडू शकलं नव्हत आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती बनले. पण याची पुनरावृत्ती होण्याची २०२७ ला शक्यता नाही. उलट पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदी विराजमान झालेली पहिली व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदींचं नाव असेल. नितीन गडकरी आणि गुप्तपणे त्यांना मदत करणाऱ्या संघ परिवारातील मराठी मंडळींनी कितीही प्रयत्न केला तरीही त्यांचं नाव टॉप पोस्ट करता येण्याची सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ संघ परिवार अमित शाहना पंतप्रधान करतील असाही नव्हे. उलट मोदींचे उत्तराधिकारी म्हणून संघाकडून एखाद नविन नाव समोर येऊ शकतं.
२०२४ ला भाजपाने लोकसभेत ४०० खासदारांच टार्गेट ठेवलं आहे आहे ते यासाठीच की स्व राजीव गांधींच्या नावावर असलेला ४०५ सदस्य निवडून आणण्याचा विक्रम मोडला जावा. त्यासाठीच अकाली दल, शिवसेना या प्रादेशिक पक्षांची साथ सोडली गेली. कदाचित एन डी ए तील शेवटचे प्रादेशिक नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही गत काही दिवसात तशीच होऊ शकते. नड्डानी केलेली दर्पोक्ती ही त्या ४०० च्या आवेशात. पण भारतातील सूज्ञ आणि लोकशाहीवर विश्वास असणारी जनता संघाच्या स्वयंसेवकांप्रमाणे न बोलता सांगेल ते ऐकणारी नाही, हे ते विसरले. कारण या लोकशाहीचा पाया नेहरूंनी घातला आहे. विरोधी मते ऐकून घेण्याची, विरोधकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याची वृत्ती भारतीय लोकशाहीत भिनलेली आहे. या वृत्तीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात केला होता त्यावेळी याच लोकशाहीप्रेमी भारतीय जनतेने त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी तमाम काँग्रेस विरोधी पक्ष एकत्र आले होते. आजही २०२४ ला तमाम भाजप विरोधी पक्ष एकत्र आले तर १९७७ ची पुनरावृत्ती होऊ शकते. आणि याची कल्पना संघ परिवारातील थिंकर्सना आहे. आणि म्हणूनच एखाद्या मायावतींना ताज कॉरिडॉर च्या तथाकथित चौकशीसाठी, तर ममता बॅनर्जीना राज्य, राज्यातील वाद आणि आपला पुतण्या सांभाळण्यात गुंतवून ठेवल आहे. इतक्यात त्या मोदी विरोधी बोलत नाहीत. बिजू जनता दल सारख्या पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुरमुना पाठिंबा देऊन भाजपशी जवळीक साधलीच आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या पक्षात संपूर्णपणे बेकायदेशीर पक्षांतर घडवून साम, दाम, दंड , भेद ही सगळी आयुधे वापरून ४०० आकडा गाठायचाच हे भाजपाच मिशन. त्यासाठी महाराष्ट्रात त्यांनी ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याच टार्गेट ठेवलं आहे. आज ४०० पारच्या गप्पा मारणाऱ्या भाजपकडे १९८४ साली केवळ दोन सदस्य होते. बाबरी पतन आणि गोध्रा दंगल या हिंसक घटनांच्या मुळे आज ते ३०३ वर पोचले आहेत. २०२४ ला ४०० पर आकडा करून एक पक्षीय हुकूमशाही घट्ट रुजवण्याचा हा प्रयत्न आहे. संघाची विचारसरणी आणि पोशाख हा बऱ्याच प्रमाणात हिटलरच्या नाझी तत्त्वज्ञानावर आधारित आहे.लोकशाही पद्धतीने निवडून आलेला हिटलरची हुकूमशाही जर्मनीमध्ये १२ वर्षे चालली होती. जर मोदींनी लोकसभा निवणुकीत हॅटट्रिक साधली तर ते कदाचित हिटलरचा विक्रम मोडू शकतात. सत्तेची दहा वर्षे चाखल्यानंतर अनेक हुकूमशहा क्रूर बनतात.हिटलर सुद्धा त्यातलाच एक. त्यामुळे मोदींना हॅटट्रिक पासून किंवा संघाच्या शताब्दी वर्षात सत्तेवर राहण्यापासून रोकायच असेल तर तमाम भाजप विरोधकांनी १९७७ प्रमाणे एकत्र आलं पाहिजे! तूर्तास इतकेच!
(लेखक जयंत माईणकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषणासाठी ओळखसे जातात.)