मुक्तपीठ टीम
चंद्रावर भारतीय चांद्रयानाच्या स्वारीसाठी सर्वच भारतीय आतूर आहेत. चांद्रयान-३ ची तयारी अगदी जोरात आणि जोशात सुरू आहे. यावेळी या तयारीला यश मिळणारच अशी आशा सर्वांनाच आहे. इस्रोने नुकतेच ‘मिशन मून’चे फोटो शेअर केले आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास या वर्षी ऑगस्टमध्ये हे मिशन सुरू केले जाऊ शकते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘स्पेस ऑन व्हील्स’ या डॉक्यूमेंट्रीत हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
इस्रोने आपल्या वेबसाईटवर ही डॉक्यूमेंट्री अपलोड केली आहे. यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत भारताने प्रक्षेपित केलेल्या ७५ उपग्रहांचेही वर्णन केले आहे.
चांद्रयान मोहिमेची डॉक्युमेंट्री
- इस्रोने जारी केलेल्या डॉक्युमेंट्रीत चांद्रयान-३ चे लँडर दाखवण्यात आले आहे.
- चंद्रावर उतरण्याचा भारतीय अवकाश मोहिमेचा हा दुसरा प्रयत्न आहे. याशिवाय १७ मिनिटांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये आदित्य एल१ मिशन आणि गगनयान देखील दाखवण्यात आले आहेत.
चांद्रयान-२ चे ऑर्बिटर वापरण्यात येणार
इस्रोचे माजी प्रमुख डॉ. सिवन म्हणाले होते की, “लवकरच इस्रो चांद्रयान-३चे प्रक्षेपण निश्चित करण्याच्या स्थितीत असेल. या मिशनमध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल. या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरचा वापर केला जाईल, तो आमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. कोरोना महामारीचा परिणाम आमच्या सर्व प्रकल्पांवर झाला आहे.”
आता चांद्रयान-३ची तयारी
- मागील चांद्रयान-२ मोहिमेनंतर सुमारे दोन वर्षांनी चांद्रयान-३ प्रक्षेपित होत आहे. हे मिशन पूर्णपणे यशस्वी झाले नाही.
- चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर त्यांच्या गंतव्यस्थानापासून काही अंतरावरच कोसळला होता.
- तसेच, या वाहनाचे ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. चांद्रयान-३ मोहिमेत इस्त्रो याचा वापर करेल.
पाहा व्हिडीओ: