मुक्तपीठ टीम
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेत भाजपा आक्रमक झाली आहे. मनसुख हिरेन यांची गाडी वाझेंकडे कशी आली? असा सवाल करतानाच वाझे हे हिरेन यांची गाडी वापरत होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर सचिन वाझे यांनी गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा होत नाही,असे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंचा बचाव करताना भाजपाला विचारलेला सवाल सध्या चर्चेत आला आहे. खरोखरच भाजपासाठी आक्रस्तळेपणाने टीव्हीवर मांडणी करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करताना सचिन वाझेंनी दाखवलेली सक्रियतेमुळे त्यांना टार्गेट केले जात आहे का? असे गृहमंत्र्यांनी विचारले होते.
गेल्या तीन दिवसांपासून फडणवीस यांनी हिरेन प्रकरण विधानसभेत लावून धरत वाझे यांच्यावर आरोप केले होते. त्यावर वाझे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अर्णब गोस्वामी-देवेंद्र फडणवीस आणि सचिन वाझे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात अन्वय नाईकांना आत्महत्येसाठी प्रवृ्त्त केल्याचा आरोप होता, तरीही ते प्रकरण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना दाबण्यात आले, असा आरोप केला. त्यामुळे तेव्हा ते का दाबण्यात आले, त्याची चौकशी करणार अशीही घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणीवस यांच्या कारकीर्दीत अर्णब गोस्वामींना वाचवण्यात आले. आघाडीची सत्ता आल्यावर त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या मागणीनुसार पुन्हा तपास झाला. तेव्हा पुरावे सापडले.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी त्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात भूमिका बजावली. तेव्हापासून ते भाजपाच्या टार्गेटवर होते, अशीही चर्चा आहे.
सचिन वाझेंची प्रतिक्रिया
माध्यमांनी सचिन वाझे यांना फडणवीसांच्या आरोपांबाबत विचारलं असता, “माझ्यावरच्या आरोपांबाबत मला अजून काहीही माहिती नाही. नेमके आरोप काय आहेत हे कळल्यानंतरच मी माझं मत मांडेन.”
तसेच,“मनसुख हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यामध्ये काय गुन्हा आहे? गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का? यात नेमका आरोप काय?” असा सवाल वाझे यांनी उपस्थित केला आहे.यावेळी त्यांना विमला हिरेन यांनी जबाबात तुमचं नाव घेतलं आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर मी जबाब वाचला नाही. त्यांनी काही आरोप केला जबाब वाचतो आणि त्यानंतर उत्तर देतो, असं ते म्हणाले.
फडणवीसांचे गंभीर आरोप
मनसुख हिरेन याच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टोला लगावला. वाझे यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. “हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला. या प्रकरणी वाझे यांना अटक करा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवली होती.
सचिन वाझेंची क्राईम ब्रँच मधून बदली
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे एसीपी सचिन वाझे यांची मुंबई क्राईम ब्रँचमधून बदली करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. वाझेंची दुसऱ्या विभागात बदली करण्यात येईल जेणेकरून मनसुख हिरेन प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. मात्र विरोधक सचिन वाझे यांच्या निलंबनासाठी आग्रही असून निलंबणानंतर त्यांना अटक करण्यात यावी यासाठी मागणी करत आहेत.