मुक्तपीठ टीम
मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई मनपाच्या कामाची आता ‘कॅग’कडून चौकशी केली जाणार आहे. यात १२ हजार कोटींच्या ७६ कामांची थेट कॅगकडून चौकशी होईल. त्याचवेळी माजी महापौर किशोरी पेडणेकरांची पोलीस चौकशी सुरु करण्यात आली आहे. संजय राऊत गजाआड, अनिल परब रिसॉर्ट अडचणीत आहेतच. एकीकडे शिवसेनेचे वाघ चौकशीच्या जाळ्यात अडकत असतानाच दुसरीकडे विरोधकांशी लढणारे भास्कर जाधव आणि अन्य नेत्यांची सुरक्षा कमी केली गेलीय. त्यामुळे शिवसेनेची चौफेर कोंडी केली जात आहे. शिवसेना आता कसा सामना करून डरकाळी घुमवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई मनपा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मोठं बलस्थान मानलं जातं. आता त्या बालेकिल्ल्यालाच ताब्यात घेण्यासाठी भाजपा आक्रमकतेने सरसावली आहे. त्यांच्यासाथीला शिंदे गट तर आहेच पण मनसेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येण्याची शक्यता आहे. भाजपा शिंदे गटाच्या या संयुक्त मोहिमेची सुरुवात शिवसेनेच्या आक्रमक नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप करून करण्यात आली. त्यांची एक नोव्हेंबरला पोलीस चौकशी होणार आहे.
एकीकडे मनपातील जाणकार मानले जाणारे शिवसेनेचे यशवंत जाधव, राहुल शेवाळे हे दोन महत्वाचे शिलेदार शिंदे गटासोबत आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद भुुषवलेल्या या दोन नेत्यांना सर्व काही माहिती आहे. त्यांची माहिती शिवसेनेच्या निष्ठावंत नेत्यांना नामोहरम करण्यासाठी वापरली जाणार असल्याची, चर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का देणारं पाऊल उचललं आहे.
कॅग म्हणजेच कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून मुंबई मनपाच्या काही कामांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
कोरोना काळात मुंबई मनपाची जवळजवळ बारा हजार कोटींची कामं देताना गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला असा संशय राज्य सरकारला आला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची विनंती शिंदे फडणवीस सरकारकडून कॅगला करण्यात आली आहे.
मुंबई मनपाच्या कोणत्या कामांची ‘कॅग’कडून चौकशी होणार?
- महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई मनपाच्या बारा कोटींच्या कामांचे कॅगच्या माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.
- कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग चौकशी करेल.
- तसेच, मुंबई मनपातील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी याचीही चौकशी होईल.
- कोरोना काळात कोरोना सेंटर उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी, सफाई कामगारांच्या घरांसाठी असलेल्या आश्रय योजना, भेंडी बाजार पुनर्विकासात रस्त्याची रुंदी कमी करून विकासकाचा झालेला फायदा या आणि अशा इतर एकूण १२ हजार कोटी रुपयांच्या ७६ कामांची कॅगकडून चौकशी होणार आहे.
- राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार गैरव्यवहार प्रकरणांची तपासणी करण्याची तयारी कॅगने केली आहे.