रोहित पाटील / सोलापूर
ज्यावेळी जिद्द, चिकाटी आणि मेहनत केली असेल त्यावेळी त्या प्रयत्नांना यश येतेच येते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील शेतकरी कुटुंबातील अॅड. काशीनाथ तिपण्णा सुरवसे यांची संघर्षमय यशोगाथा अशीच आहे. त्यांनी अतिशय कष्ट केले. शिक्षणानं ज्ञानाचे पंख मिळवले. आपल्या परिश्रमांनी त्या पंखांना आणखी बळ देत कायद्याच्या विश्वात उड्डाण केले. आज त्यांनी एक शिखर गाठलं आहे ते न्यायाधीशपदाचं!
घरची हालाखीची परिस्थिती असताना ही सुरवसे यांनी अनेक संकटांना सामोरे जात आपले शिक्षण घेतले. अॅड. काशीनाथ सुरवसे यांचे प्राथमिक शिक्षण नांदणी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण लोकसेवा हायस्कुल मंद्रुप येथे झाले. तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण संतोष भिमराव पाटील महाविद्यालयात घेतले.
शिक्षण घेत असतानाही काशीनाथ सुरवसे वडिलांना शेतातील कामात मदत करायचे. शेतीतील कामे सांभाळतानाही त्यांनी शिक्षणाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही.
बीएची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला या ठिकाणी एलएलबी पूर्ण केल्यानंतर सोलापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी वकिली सुरु केली. त्यांनी अतिशय प्रयत्न केले. त्यांना दुसर्या प्रयत्नात यश मिळाले आणि ते न्यायाधीश परिक्षेत उत्तीर्ण झाले. अॅड.अझमुद्दीन शेख, अॅड. गणेश पवार, अॅड. पी पी कुलकर्णी या सर्वांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचे काम केले.
अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे अॅड. सुरवसे यांना दुसर्या प्रयत्नात यश मिळाले. ते न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झाले. ही परिक्षा १ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. तर या पदासाठी मुख्यपरिक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. तर यासाठी २३ मार्च २०२२ रोजी मुलाखत घेण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या.त्यांच्या या यशामध्ये त्यांना सहकारी वकील मित्र, आई वडील, पत्नी, भाऊ यांचे सहकार्य मिळाल्याचे अॅड. सुरवसे यांनी सांगितले.