मुक्तपीठ टीम
नाशिक येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण केल्यामुळे अनेकांच्या मनात दाटलेल्या संतापाचा स्फोट झाला, असे मत या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. “काळं केलं त्याला. समाधान वाटलं.
आमच्या आईची बदनामी करतो तो!” या शब्दात कुबेरांवर शाईफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे आणि राजेश गुंड यांनी शाईफेकीनंतर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचवेळी राजकीय नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी एका इंग्रजी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या मातोश्रींची हत्या केल्याचे लिहिल्याने काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर वगळता एकाही राजकीय नेत्यांने पुस्तकातील लिखाणाविरोधात भूमिका घेतली नव्हती. संभाजी ब्रिगेडने त्यावेळीही कुबेरांच्या पुस्तकाविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, त्या पुस्तकाविरोधातील लिखाणाविरोधात संताप वाढत असतानाही कोणीही लक्ष दिले नाही. त्याचीच परिणती आजच्या शाईफेक करण्यात झाल्याचे मानले जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी माध्यमांना सांगितले आहे. या शाईफेकीचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शाईफेकीचं समर्थन केले आहे तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
“काळं केलं त्याला. समाधान वाटलं. आमच्या आईची बदनामी करतो तो!”
गिरीश कुबेरांवर शाई फेकणारे दोघेजण संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत. सतीश काळे हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर राजेश गुंड हे सहकारी आहेत. सतीश काळे म्हणाले, “काळं केलं त्याला. समाधान वाटलं.
आमच्या आईची बदनामी करतो तो. संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली असे डायरेक्ट लिखाण केलेलं आहे. त्याच्यासाठी फासावर जाण्याची तयारी आहे. आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. गाडीवर टू व्हिलरवर सकाळी सहा वाजता निघालेलो आहोत.”
गिरीश कुबेरांवरील शाईफेकीवरील प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस: शाईफेक योग्य नाही!
- साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्रं असतं.
- तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसर कुठेही करता येते.
- अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही.
प्रवीण दरेकर : शाई फेकीला विरोधाचं कारण नाही!
- गिरीश कुबेरांवरील शाईफेक संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे.
- वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती.
- त्याविरोधात लिखाण करता आलं असतं. पण प्रत्येकाची पद्धत असते.
- काही लोक लेखणीतून वार करतात. संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे.
- छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह लिखाणामुळे शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही.
- छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे.
- त्यांच्याबद्दल कोणी लिहित असेल, बोलत असेल तर कोणीही सहन करणार नाही.
छगन भुजबळ: निवेदनाने नाराजी व्यक्त करतील, असं वाटलेलं!
- संभाजी ब्रिगेड आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी निवेदन देईल, असं मला वाटलं होतं.
- असा काहीतरी प्रकार घडेल अशी सकाळपासून कुणकुणही होती.
- संभाजी ब्रिगेडशी काहीतरी वाद आहे, याचाही अंदाज होता.
- मी आणि माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः त्यांना घेऊन फिरलो.
संजय राऊत: शाईफेक चुकीची, लिखाणही चुकीचे!
- साहित्य संमेलाच्या ठिकाणी असा प्रकार करणे चुकीचं आहे.
- यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गिरीश कुबेर यांच्या लिखाणात काही चुका असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
- छत्रपती संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह लिखाण करणे चुकीचे आहे.
हेही वाचा:
संभाजी ब्रिगेडची काय होती भूमिका? वाचा:
संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेरांसोबत सर्वच नेते! खरे महाराष्ट्रद्रोही कोण?