मुक्तपीठ टीम
एक एप्रिल म्हटले की आठवतो एप्रिल फूलचा दिवस. कुणीतरी मूर्ख बनवेल की काय! यावेळी एक एप्रिलला आपण महागाई अगदी फुल टू वाढलेली पाहणार आहोत. त्यामुळे उन्हाच्या काहिलीत महागाईच्या तापाचा वेगळा तडाखा बसणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे सर्वांचे खिसे आधीच रिकामे झाले आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढत आहेत. त्यात अजून काही वस्तू आणि सेवांच्या महागाईची भर पडणार आहे. कारण आता १ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी महागड्या होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक कंपन्या उन्हाळ्यापूर्वी एसी, कुलर, फ्रीज यासारख्या उत्पादनांच्या किंमती वाढवतील. हवाई प्रवास वर्षामध्ये तिसऱ्यांदा महाग होईल.
उन्हाळ्यात असा वाढणार महागाईचा ताप!
• उन्हाळा सुरू झाला आहे आणि फ्रीझ, कूलर, एसी या गारवा देणाऱ्या जवळपास सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी स्वाभाविकच वाढणार आहे. नामवंत ब्रँडनी आधीच जाहीर केले आहे की, १ एप्रिलपासून बहुतेक वस्तूंच्या किंमती वाढविल्या जातील. ही वर्षातील दुसरी वाढ असेल.
• लोकल मोबाइल पार्ट्स, मोबाइल चार्जर्स आणि अॅडॉप्टर्स, गॅझेटच्या बॅटरी, हेडफोन्सवरील इम्पोर्ट ड्यूटी २.५% वाढवण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात म्हटले होते.
• देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती आणि निसान इंडियाने १ एप्रिलपासून त्यांच्या गाड्यांची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.
• याशिवाय इतरही काही कंपन्या वेगवेगळ्या मॉडेल्स महागड्या करु शकतात.
• हीरो मोटोकॉर्पने म्हटले आहे की, ते दुचाकीची किंमत २५०० रुपयांपर्यंत वाढवतील. बाईक व स्कूटरच्या कोणत्या मॉडेलवर किती पैसे वाढविण्यात येतील हे बाजारपेठेनुसार ठरवले जाईल.
• विमान प्रवासाचे तिकीट महाग केल्यानंतर आता एव्हिएशन सिक्युरिटी शुल्क (एएसएफ) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शुल्क वाढल्यामुळे १ एप्रिलपासून हवाई प्रवास महाग होईल.
• प्रवाश्यांसाठी सध्याचा एएसएफ १६० रुपये आहे, जो २०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. नवीन दर १ एप्रिल २०२१ पासून तिकिटांवर लागू होईल.