मुक्तपीठ टीम
हभप इंदुरीकर महाराजांच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी. इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका कथित वादग्रस्त वक्तव्यासंबंधी त्यांच्याविरूद्ध संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे. इंदुरीकर यांनी जे वक्तव्य केल्याचा आरोप आहे, तो आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील संदर्भ आहे. कीर्तनात असा ग्रंथातील संदर्भ देणे हा गुन्हा ठरत नसल्याचे निरीक्षण संगमनेरच्या सत्र न्यायालयाने यावर निर्णय देताना नोंदविले आहे.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर २६ जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये १९ जून २०२० रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यूच्या आदेशाला इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.
संगमनेरच्या सत्र न्यायालयाने या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर त्यावरील सुनावणी विविध कारणांनी प्रदीर्घकाळ रखडत गेली. मधल्या काळात सरकारी वकील बदलण्यात आले. सरकारतर्फे अड. अरविंद राठोड यांनी तर इंदुरीकरांतर्फे अॅड. के. डी. धुमाळ यांनी बाजू मांडली. तर मूळ तक्रारदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अॅड. रंजना गवांदे यांनी बाजू मांडली. संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आज यावर निर्णय दिला. इंदुरीकरांचा पुनरिक्षण अर्ज मंजूर करण्यात येऊन कनिष्ठ न्यायालयाने दिलेला खटला चालविण्याचा आदेश रद्द करण्यात आला.