मुक्तपीठ टीम
शिख धर्मात गुरुद्वारे हे अखंड सेवेचे प्रतिक मानले जातात. गुरु ग्रंथ साहिबचे अविरत पाठ सुरुच असतात. कमालीची स्वच्छता असते. पण त्याचवेळी सेवेचा एक धगधगता यज्ञ प्रत्येक गुरुद्वारात लंगरच्या रुपानं धगधगत असतो. आता कोरोना संकटातही ही लंगर भुकेल्यांच्या पोटी दोन घास तेही चांगले दर्जेदार पुरवत आहेच, पण सर्वात महत्वाचं म्हणजे काही गुरुद्वारे ऑक्सिजनची लंगर चालवत आहेत.
नवी मुंबईतील खारघर आणि अन्य गुरुद्वारांनी ऑक्सिजनचे छोटे सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे किमान ऑक्सिजन अभावी कुणाचे प्राण जाणार नाहीत.
तेथे दिल्लीजवळच्या गाझियाबादमध्ये तर पंजाबींच्या मोठ्या मनासारखेच मोठी ऑक्सिजन लंगर सुरु आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात बरेच लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत आणि त्यांच्यापरीने लोकांना मदत करत आहेत. पण राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये या गुरुद्वाराने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ज्या अंतर्गत गुरुद्वारा ऑक्सिजन लंगर सेवा करीत आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम गुरुद्वाराने कोरोना संसर्गामुळे रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन ऑक्सिजन लंगर सेवा सुरू केली आहे.
त्या गुरुद्वारा प्रबंधन समितीने आवाहन केले आहे की, ज्या लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांनी इंदिरापुरम परिसरातील गुरुद्वारा गाठावे आणि त्यांना तेथे ऑक्सिजन सेवा दिली जाईल. ज्या लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, ते स्वत: स्वत: च्या गाडीतून तेथे रूग्णांपर्यंत पोहोचत असतात आणि त्यांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. संस्थेची टीम आपल्या पातळीवरून सिलिंडर्सचे रिफिलिंग करून येथे व्यवस्था करत असते. गुरुद्वाराचे व्यवस्थापक गुरप्रीतसिंग रम्मी म्हणाले की, “आम्ही रस्त्यावरच गाडीतच ऑक्सिजन पुरवित आहोत. एका सिलिंडरमुळे अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे रोज जास्तीत जास्त सिलिंडर मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते.”
पाहा व्हिडीओ: